नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानने त्यांच्याकडे किती अण्वस्त्रे आहेत, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण सोमवारी केली. दोन्ही देशांनी परस्परांवर अण्वस्त्र हल्ला करू नये, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे १९९२ पासून दोन्ही देश ही माहिती एकमेकांना देत आहेत.
काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तरी देखील आपल्याकडील अण्वस्त्रांची माहिती देण्याची कार्यवाही दोन्ही देशांनी थांबविलेली नाही. आतापर्यंत सलग ३३ वेळा अण्वस्त्रांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना दिली आहे.
मच्छीमार, नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करा : भारताची मागणीपाकिस्तानच्या कैदेत असलेल्या व शिक्षेचा कालावधी संपलेल्या १८४ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या १२ भारतीय नागरिकांशी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा, असेही भारताने म्हटले आहे. सागरी हद्द ओलांडल्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या मच्छीमारांना अटक करतात. दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी त्यांच्या यादीची देवाण-घेवाण करतात.