Parliament Session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता मंगळवारी(दि.30) सीतारामन यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "अर्थसंकल्प तयार करणारे आणि हलवा समारंभात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणे, हे समाजाला अनेक वर्गात विभागण्याचे षडयंत्र आहे. राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी समाजातील किती लोकांना स्थान मिळाले?" अशी विचारणा अर्थमंत्र्यांनी केली.
2013-14 मध्ये अधिकाऱ्यांची जात का विचारली नाही?सीतारामन पुढे म्हणतात, "हा फोटो इव्हेंट कधीपासून बनला? 2013-14 मध्येही अर्थसंकल्पापूर्वी हलवा समरांभ झाला होता. तेव्हा कोणी अधिकाऱ्यांची जात विचारली होती का? आता अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांची जात विचारून लोकांमध्ये फूट का टाकताय? मिंटो रोडवर जेव्हा बजेट पेपर छापले जायचे, तेव्हापासून हा सोहळा सुरू आहे. बजेटची तयारी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडूनच हलवा तयार केला जातो, ही भारतीय परंपरा आहे," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
अर्थमंत्री इथेच थांबल्या नाहीत, तर त्यांनी राहुल आणि काँग्रेसलाच उलट प्रश्न केला. त्या म्हणाल्या की, "पूर्वीची काँग्रेस सरकारे आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यासारखे पंतप्रधानदेखील आरक्षणाचे मोठे टीकाकार होते. आता राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील किती लोकांना स्थान देण्यात आले आहे? हे काँग्रेसने सांगावे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी काय म्हटले होते?सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत देशाचा अर्थसंकल्प बनवण्याचे काम 20 अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र सहभागी अधिकाऱ्यांमध्ये केवळ एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे. त्यांच्यामध्ये एकही दलित किंवा आदिवासी नाही, असा दावा केला. तसेच, राहुल यांनी अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या हलवा समारंभाचा हवाला देत या सरकारमध्ये फक्त 2-3 टक्के लोकच हलवा बनवतात आणि तेवढेच लोक खात असल्याचा आरोप केला होता. लोकसभेत हलवा समारंभाचा फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले, या फोटोमध्ये मला कोणताही ओबीसी किंवा आदिवासी किंवा दलित अधिकारी दिसत नाही, असाही आरोप केला.