मोदी सरकारला 8 गुण देणाऱ्या नवीन पटनायकांना भाजपनं किती गुण दिले? काँग्रेसचाही हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:47 PM2023-09-27T19:47:51+5:302023-09-27T19:49:50+5:30
पटनायक यांनी रविवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे कौतुक करत, मोदी सरकारला परराष्ट्र नीती आणि गरीबी निर्मूलनाच्या कामासाठी 10 पैकी 8 गुण दिले होते.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नुकतेच 10 पैकी 8 गुण दिले आहेत. मात्र, मोदी सरकारला 8 गुण देणाऱ्या बिजू जनता दलाच्या राज्य सरकारला भाजपने 'शून्य' गुण दिले आहेत. एवढेच नाही, तर काँग्रेसनेही पटनायक सरकारवर हल्ला चढवला असून, पटनायक यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचे म्हटले आहे.
पटनायक यांनी रविवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे कौतुक करत, मोदी सरकारला परराष्ट्र नीती आणि गरीबी निर्मूलनाच्या कामासाठी 10 पैकी 8 गुण दिले होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते जयनारायण मिश्रा म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी (नवीन पटनायक) पंतप्रधानांच्या संपूर्ण कामगिरीसाठी 10 पैकी 10 गुण द्यायला हवे होते. मात्र, मी प्रत्येक आघाडीवर पटनायक यांना त्यांच्या कामासाठी शून्य गुण देईन. पंतप्रधानांचे सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे. तर पटनायक सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहे.”
काँग्रेस आमदार ताराप्रसाद बहिनीपती म्हणाले, मी राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींनाही “मोठे शून्य” देईन. “ या दोघांनीही जनतेसाठी काहीही केले नाही,” असा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या बाजूला, बीजदचे आमदार शशी भूषण बेहरा यांनी म्हटले आहे की, पटनायक यांना “मिश्रा तथा बहिनीपती यांच्याकडून रेटिंगची आवश्यकता नाही. ओडिशाच्या जनतेने पटनायक यांना सलग पाच वेळा मुख्यमंत्री करत पूर्ण गुण दिले आहेत.”