धार : मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवराजसिंह चौहान सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. धार येथील एका सभेदरम्यान राहुल यांनी बटाट्याच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना किती आणि चिप्स बनविणाऱ्या कंपन्यांना काय मिळते याचे गणित मांडले.
चिप्सचे पाकिट घेताना कधी बटाट्याला मिळणाऱ्या भावाचा विचार केला आहे का? शेतकऱ्यांकडून बटाटा 5 रुपये किलो दराने खरेदी केला जातो. या किलोमध्ये किती बटाटे असतात आणि एका पाकिटातले चिप्स किती बटाट्यांपासून बनविले जातात, केवळ अर्ध्या बटाट्यापासून. याचा खर्च केवळ 50 पैसे किंवा त्याहुनही कमी येतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
यापूर्वी राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सशी जोडल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण कन्फ्युज झाल्याने शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण दिले होते. "मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात होतो. खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव केली.