हैदराबाद : आपल्या देशात वाहतुकीचे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात हे सांगायला नकोच. पण कधीतरी सिग्नल तोडला किंवा चुकून नो एन्ट्रीत घुसल्यामुळे शे पाचशेचाही दंड भरावा लागू नये म्हणून काळजी घेणारे आपण आज एका अशा एका महाभागाशी ओऴख करून घेणार आहोत, ज्याच्यावर मोटारसायकलच्या किंमती एवढा दंडच आकारला गेलाय. तब्बल 135 पावत्या या महाभागाने गोळा केल्या आहेत.
हा मोटारसायकल स्वार हैदराबादचा रहिवासी आहे. त्याच्याकडे हिरोची ग्लॅमर ही मोटारसायकल आहे. त्याला नुकतेच हॅल्मेट न घातल्याने वाहतूक पोलिसांनी थांबविले आणि त्यांच्या अॅपवर पाहतात तर काय, या महाभागाने आजपर्यंत 135 वेळा नियम तोडले पण दंडच भरलेला नसल्याचे समोर आले. मग काय, या महाभागाची मोटारसायकल जप्त करून त्याला न्यायालयात पाठविण्यात आले.
कृष्णा प्रकाश असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. TS10 ED 9176 हा त्याच्या दुचाकीचा नंबर. कृष्णा यांनी बऱ्याचवेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. यामध्ये सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा घटनांचाही समावेश आहे. हैदराबादमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यामुळे वाहन चालकाने नियम मोडल्यास त्याच्या वाहनाच्या पत्त्यावर दंडाचे चलन पाठविले जाते. यासाठी वाहतूक पोलिसांची गरज नसते.
कृष्णा यांनी पहिल्यांदा जून 2016 मध्ये नियम तोडला होता. त्यावेळी त्यांनी दंड भरला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी केवळ घरी येणाऱ्या पावत्या साठविण्यास सुरुवात केली. दोन वर्षात या पावत्यांनी 135 चा आकडा ओलांडला. पण या महाभागाने एकदाही वाहतूक शाखेत जाऊन दंड सोडा पण साधी विचारपूसही केली नाही. या पावत्यांची एकूण दंडाची रक्कम त्याची ग्लॅमर मोटारसायकल विकूनही येणार नाही. तब्बल 31 हजार 556 रुपये.
या दंडाच्या पावत्यांमध्ये मोबाईलवर बोलल्याची 1035 रुपयांची सर्वात जास्त आणि हेल्मेट न घातल्याची 135 रुपये ही सर्वात कमी दंडाची रक्कम आहे. कृष्णा यांना पकडल्यानंतर त्यांनी आपल्याला गेल्या 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने दंड भरता आला नसल्याचे कारण दिले आहे. कृष्णा हे एका खासगी कंपनीमध्ये अकांऊंट मॅनेजर आहेत.