पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:11 PM2019-09-15T15:11:34+5:302019-09-15T15:12:03+5:30
हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले.
नवी दिल्ली - देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर वाहन विक्री घटल्यामुळे देशातील अनेक शहरातील गाड्यांचे शोरूम बंद होत होत आहेत. या मुद्दावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे विविध वृत्तवाहिन्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रवक्ते चर्चा करताना दिसत आहेत. मात्र अशाच एका चर्चेत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
एका वृत्तवाहिनीवर संबित पात्रा भाजपची बाजू मांडत होते. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवर मंदीचा काहीही परिणाम होत नसल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भारताला ५ ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठीच्या प्रयत्नाविषयी सांगितले. मागील पाच वर्षांत अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली असून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पार करणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी संबित पात्रा यांची बोलती बंद केल्याचे दिसून आले. सुरुवातीला गौरव वल्लभ यांनी काँग्रेसने मागील ७० वर्षांत काय केले त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर संबित पात्रा यांच्यावर अर्थव्यवस्थेतील मंदीवरून टीका केली. त्याचवेळी संबित पात्रा पुन्हा ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा करत होते. त्यामुळे वल्लभ यांनी पाच ट्रिलियनवर किती शून्य असतात, असा प्रश्न पात्रा यांना विचारला. त्यावर पात्रा यांनी उत्तर देणे टाळून उलट राहुल गांधींना हा प्रश्न विचारा अशी मागणी केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. संबित पात्रा यांनी या प्रश्नाचे उत्तर ऑफ कॅमेरा देखील देण्याचे टाळले.
दरम्यान हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले.