नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्ताननेभारतासाठी स्वतःची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्ताननं ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे.
बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. बालकोट एअरस्ट्राईकनंतर तब्बल 138 दिवस पाकिस्तानची एअरस्पेस बंद असल्याने भारताला कोट्यावधीचे नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा घेतलेल्या हवाई हद्द बंद करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.
मागील वेळी किती झालं होतं नुकसान?138 दिवस पाकिस्तानने एअरस्पेस बंद ठेवल्याने पाकिस्तानला 5 कोटी डॉलर(360 कोटी) रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान ओवरफ्लाइंग चार्जच्या स्वरूपात झाले होते. फक्त एकट्या एअर इंडियाला 560 कोटी रूपये जास्त खर्च करावे लागले होते. त्याशिवाय इंडिगो, स्पाइसजेट, गोएअर यांना 60 कोटींचे नुकसान सहन करावं लागलं होतं.
दिवसाला 400 उड्डाणांवर होणार परिणामबालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रतिदिन 400 विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला होता. बहुतांश विमानांनी ओमन मार्गे उड्डाण घेतलं होतं. तर इराणमार्गे 100 पेक्षा अधिक विमान वाहतूक सुरू होती. ओमन मार्गे उड्डाण घेणाऱ्या भारतीय विमानांना लंडन ते सिंगापूरदरम्यान 451 किमी अंतर वाढलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्याने हीच परिस्थिती समोर येणार आहे.
पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने भारतातून दक्षिण आशिया आणि यूरोपच्या विविध भागात जाण्या-येण्यासाठी लांबचा पल्ला घ्यावा लागतो. या विमानांना पाकिस्तानऐवजी मुंबई-अरबी समुद्र-मस्कट खाडीमार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पूर्व पट्ट्यातून विमान उड्डाण घेणाऱ्यांना अमेरिकेला जाण्यासाठीचा वेळ वाढला जातो आणि इंधन भरण्यासाठीही पूर्वीपेक्षा अधिक ठिकाणी स्टॉप घ्यावा लागतो. त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढतो.
पाकिस्तानच्या या निर्णयाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज एअर इंडियाच्या पायलटने सांगितले की, आम्ही 5 ऑगस्टला ज्या दिवशी कलम 370 रद्द केला तेव्हापासून आम्ही तयार आहोत. आम्ही मागीलवेळी केलेली रणनीती वापरणार आहे. यासाठी आम्हाला अतिरिक्त खर्च उचलावा लागणार आहे. मात्र तेल कंपन्यांना त्यांची थकबाकी न मिळाल्याने मागील आठवड्यापासून 6 विमानतळांवर एअर इंडियाला इंधन देणं बंद केलं आहे. इतरही अनेक विमान कंपन्यांनी अतिरिक्त खर्च उचलण्यासाठी तयारी आधीच करून ठेवली होती.