Indian Railway Debt: गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. स्टेशन आधुनिकीकरणपासून विविध प्रकारच्या नव्या प्रीमियम रेल्वेसेवा, प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षितता यांवर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेवरील कर्जात गेल्या ४ वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांचे भर पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन २०२० नंतर हा आकडा अनेकपटीने वाढला, असेही सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कर्जात ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बड्या प्रकल्पांना कर्जाचा आलेख वाढत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. याशिवाय कोरोना काळातही रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. सन २०१९-२० मध्ये कर्ज २० हजार ३०४ कोटी रुपये होते, ते २०२०-२१ मध्ये २३ हजार ३८६ कोटी रुपये झाले. २०२१-२२ मध्ये हा आकडा २८ हजार ७०२ कोटी रुपये होता. रोलिंग स्टॉक, मालमत्ता खरेदी आणि इतर प्रकल्पांसाठी भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून मदत घेतल्याचे वृत्त आहे.
भारतीय रेल्वेवरील कर्जाचा बोजा वाढतच राहिला
सन २०२२-२३ मध्येही रेल्वेला कर्जातून दिलासा मिळालेला नाही. भारतीय रेल्वेवरील कर्जाचा हा आकडा ३४ हजार १८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही अनेक मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करत आहोत. यासह, रेल्वे कर्ज कमी करण्यासाठी अंतर्गत सेवांमधून महसूल वाढवण्याचे मार्ग शोधत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, सन २०२०-२१ मध्ये कोरोना काळात भारतीय रेल्वेने रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली होती. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भारतीय रेल्वेला ७९ हजार ३९८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. रेल्वेचे म्हणणे आहे की, या कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू होईल. विशेष म्हणजे अनेक मोठे रेल्वे प्रकल्पही एकाच वेळी सुरू आहेत.