नवी दिल्ली : हिमाचलच्या जनतेने निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने का केला? अग्निपथ योजना रद्द करण्याचे आश्वासन मावळते पंतप्रधान देतील का? मोदी सरकारने रेल्वे प्रकल्पांवर काम का केले नाही?, असे प्रश्न काँग्रेसने पंतप्रधानांना विचारले आहेत.
इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजपने लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हाताने विकलेल्या सहा आमदारांना विधानसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले. भाजपने निर्लज्जपणे त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.
भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत घाणेरडे राजकारण हे भाजपचे तत्व झाले आहे. गोव्यापासून सिक्कीमपर्यंत, महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत आणि आता हिमाचल प्रदेश - कोणतेही राज्य त्यांच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. त्यांनी उघडपणे बेकायदेशीरपणे निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या पैशांतून देशातील सरकारांना पाडण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना किती पैसे मोजावे लागले? पक्षांतरासाठी प्रत्येक आमदाराला किती पैसे दिले? मावळते पंतप्रधान अभिमानाने भारताला “लोकशाहीची जननी” म्हणतात. त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि विश्वासघाताचा भारत मातेला अभिमान वाटेल का?, असा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला आहे.