उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते राजकीय नेते बनलेल्या अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. टीएमसीचे म्हणणे आहे की भाजपाच्या संदेशखालीच्या उमेदवार रेखा पात्रा यांना २००० रुपयांत खरेदी केले गेले होते. ममता बॅनर्जी तुमची किंमत काय आहे, १० लाख रुपये? यामुळेच तुम्ही तुमचा मेकअप एका प्रसिद्ध सौंदर्य चिकित्सकाकडून करुन घेत असता, असे वक्तव्य गंगोपाध्याय यांनी केले आहे.
रेखा पात्रा यांना खरोखरच २००० रुपयांत विकत घेतले जाऊ शकते का, एखादी महिला दुसऱ्या महिलेला एवढे अपमानित कसे काय करू शकते, असा सवाल त्यांनी विचारला आहे. गंगोपाध्याय यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. टीएमसीने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. गंगोपाध्याय यांनी सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री पदावरील एका महिलेवर महिलाविरोधी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्या महिलेला तिची किंमत विचारण्यात आली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
एखादा सभ्य व्यक्ती अशा भाषेचा वापर करेल यावर आपला विश्वास बसत नसल्याचे पश्चिम बंगालच्या अर्थ मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. तसेच गंगोपाध्याय यांची टीका टीएमसी हलक्यात घेणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी अपमानास्पद शब्दांचा वापर करत सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आता लोक गंगोपाध्याय यांना माणूस म्हणून पाहणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.