- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल करीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे जगातील सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ असून मोदी सरकारच राजन यांच्या लायकीचे आहे काय, असा सवाल केला.भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रघुराम राजन यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यात यावा काय, असा प्रश्न चिदंबरम यांना करण्यात आला तेव्हा हे सरकारच राजन यांना पदावर कायम ठेवण्यास पात्र आहे की नाही याचा विचार आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपतो आहे. पत्रपरिषदेत चिदंबरम बोलत होते. चिदंबरम यांनी स्वामींकडून राजन यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळताना खुद्द पंतप्रधान आणि अर्थमंत्री राजन यांच्याविरुद्ध काही बोलले तरच काँग्रेस या मुद्द्यावर वक्तव्य करेल, असे स्पष्ट केले.ते म्हणाले की, संपुआ सरकारने जगातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांमध्ये गणल्या जाणाऱ्या व्यक्तीस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केले. अर्थमंत्री या नात्याने आपणालाही राजन यांच्या व्याजदरासंदर्भात भूमिकेवर आक्षेप होता काय, असा प्रश्न विचारला असता चिदंबरम म्हणाले की, प्रत्येक जण आपआपल्या दृष्टीने अर्थव्यवस्थेकडे बघत असतो. सरकारचा दृष्टिकोन हा वृद्धीचा असतो. तर आर्थिक स्थैर्य बँकेच्या केंद्रस्थानी असते. ‘अंधांच्या जगात एकाक्ष राजा’ या राजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टीकेसंबंधी बोलताना त्यांनी लगेच मतदान करा. कोण खरे, कोण खोटे हे सिद्ध होईल, असा टोला हाणला. संपुआ सरकारचे सर्व केंद्रीय बँक गव्हर्नरसोबत चांगले संबंध होते आणि विद्यमान गव्हर्नरचाही त्यात समावेश आहे. जगभरात अर्थमंत्री व केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरदरम्यान असे संवाद होत असतात. परंतु याचा अर्थ अर्थमंत्री आरबीआय गव्हर्नरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात असे नाही.