Arvind Kejriwal News: सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर आज भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत. भाजपाने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपाने निवडणुकीच्या प्रचारात भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल निवडणुकीत पराभूत झाले. अरविंद केजरीवाल आता आमदारही नाहीत आणि मुख्यमंत्रीही नाहीत. ते केवळ पक्षाचे प्रमुख म्हणून आता राजकीय कारकीर्द पुढे सुरू ठेवू शकतात. ते फक्त माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. आता त्यांना ना पगार मिळेल ना सरकारी बंगला. माजी मुख्यमंत्री असल्याने ते स्वत:साठी सरकारी निवासाची मागणी करू शकतात, पण त्यांना बंगला मिळण्याची शक्यता नाही. आता अरविंद केजरीवाल यांना फक्त पेन्शन आणि काही सुविधा मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांना आता किती पेन्शन मिळणार?
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मासिक ६० हजार रुपये वेतन आणि काही भत्ते मिळतात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा एकूण १.२५ लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय इतरही सुविधा आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना पगार देण्याची तरतूद नाही. परंतु, पेन्शन मिळू शकते. मुख्यमंत्री, आमदार, माजी आमदार इत्यादींच्या पगारात दोन वर्षांपूर्वी बदल करण्यात आले. हे बदल १४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाले आहेत. यानुसार, दिल्लीच्या माजी आमदाराला दरमहा १५ हजार रुपये पेन्शन दिले जाते. एखादा आमदार एकापेक्षा जास्त वेळा जिंकला तर त्याच्या पेन्शनमध्ये दरमहा १००० रुपये वाढ होते. या नियमानुसार अरविंद केजरीवाल यांनाही पेन्शन मिळेल. यावेळी ते निवडणूक हरले असल्याने त्यांच्या पेन्शनमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. अरविंद केजरीवाल यांना एका माजी आमदाराप्रमाणे पेन्शन मिळेल. हे पेन्शन दरमहा १५ हजार रुपये असेल.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना ज्या सुविधा दिल्या जातील, त्या माजी आमदार म्हणून मिळतील. केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील. सरकारी रुग्णालयांव्यतिरिक्त काही खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येतील. त्यांना प्रवास भत्ता मिळेल. परंतु, प्रवास भत्ता फक्त अधिकृत प्रवासासाठी असेल. टेलिफोन खर्च, इंटरनेट भत्ता मिळतील. माजी मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा आणि सरकारी वाहन दिले जाईल आणि ड्रायव्हरही मिळेल.