NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:40 PM2023-11-07T21:40:24+5:302023-11-07T21:42:10+5:30
PM Modi Speech: केंद्र सरकारने ओबीसींसाठी कोणतेही काम केले नसल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे.
Telangana Election 2023: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेलंगणा (Telangana) दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (7 नोव्हेंबर) हैदराबादमधील सभेतून त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तेलंगणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार, तो इतर मागासवर्गीय (ओबीसी) मधून असणार, असा दावा मोदींनी व्यक्त केला.
पीएम मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि बीआरएस मागासवर्गीय व्यक्तीला कधीही मुख्यमंत्री बनवणार नाहीत. दोघांच्या डीएनएमध्ये तीन गोष्टी- भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि घराणेशाही, समान आहेत. एनडीए आणि भाजप ओबीसींच्या हिताची सर्वाधिक काळजी घेते. आम्ही ओबीसींना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व दिले. देशातील कुंभार, सोनार, सुतार, शिल्पकार, धोबी, शिलाई, चांभार, न्हावी, यासह इतर अनेक समाज ओबीसी प्रवर्गातून येतात. अशा सर्व लोकांसाठीच भाजप सरकारने पीएम विश्वकर्मा योजना आणली.
Mood across Telangana is phenomenal. People are set to bless the BJP in record numbers. Addressing a rally in Hyderabad. https://t.co/Lba0NtLNoA
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2023
केंद्रातील एनडीए सरकारमध्ये 27 ओबीसी मंत्री आहेत, जो स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक आकडा आहे. आज देशात भाजपचे 85 ओबीसी खासदार आहेत. आज देशात भाजपचे 365 ओबीसी विधानसभा सदस्य आहेत. मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री आणि केंद्रीय स्वतंत्र प्रभारासह एकूण 77 मंत्री आहेत. यातील 27 मंत्री ओबीसी समाजातून येतात, म्हणजेच 35 टक्के मंत्री ओबीसी आहेत.
केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी कोणतेही काम केले नसल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष देशात जात जनगणनेची मागणी करत आहेत. आमचे चारपैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी प्रवर्गातील आहेत, असा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जातोय.