अलिगढ: लोकसभा निवडणूक २०२४ ची सेमीफायनल मानल्या जात असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस यांनीदेखील जोर लावला आहे. याशिवाय एमआयएमदेखील या निवडणुकीत नशीब आजमवत आहे. सध्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या एका जिल्हाध्यक्षाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ओवेसींना पंतप्रधान करायचं असल्यास मुस्लिमांना आणखी मुलं जन्माला घालावी लागतील, असं जिल्हाध्यक्ष म्हणताना दिसत आहे. अलिगढचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ओवेसींना पंतप्रधान करायचं असल्यास मुस्लिमांना काय करावं लागेल, याबद्दलचा सल्ला नूर लोकांना देत आहेत.
'मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार? शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?', असे प्रश्न विचारुन नूर मुस्लिम जनतेला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करत आहे.
गुफरान नूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. 'बलिदानात आमचं मोठं योगदान आहे. मात्र लोकसंख्येत आमचं प्रमाण कमी आहे. ओवेसी साहेब पंतप्रधान व्हावेत हे माझं वैयक्तिक मत आहे. ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील याबद्दलची चर्चा आम्ही करत होतो. त्यात गैर काहीच नव्हतं,' असं नूर म्हणाले.