नवी दिल्ली - अलीकडच्या काळात जियो पॉलिटिक्समध्ये फार बदल झाले आहेत. विशेषत: दक्षिण आशियात याचे परिणाम दिसून येतात. त्याचा सर्वात जास्त प्रभाव भारतावर झालेत. बांगलादेशात सत्तापालट होणं हे भारताला कुठल्याही झटक्यापेक्षा कमी नाही. तुम्ही मित्र बदलू शकता, शेजारी नाही असं विधान भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी केलं होतं. भारताची समस्या म्हणजे देशाला चांगले शेजारी मिळाले नाहीत.
भारताचे जितके शेजारील देश आहेत त्यात एकही असा नाही जिथं राजकीय स्थिरता प्राप्त झाली आहे. एक बांगलादेश होता, जो काहीदृष्ट्या राजकीय आणि आर्थिक स्थिर होता मात्र मागील आठवड्यात तिथेही सत्तापालट झाली. पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडावा लागला. सध्या शेख हसीना या भारतात आहेत.
भूतान वगळता सध्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये अशी सरकारे आहेत ज्यांची भूमिका भारतविरोधी मानली जाते. नेपाळमध्ये गेल्या महिन्यातच सत्ता बदलली आहे. त्याठिकाणी चीन समर्थक सरकार आलं आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार आहे ज्याचे प्रमुख मोहम्मद युनूस आहेत. परंतु पुढील काही महिन्यात तिथे निवडणूक लागेल आणि तिथं असं सरकार येण्याची स्थिती आहे जे भारताविरोधातील असेल.
बांगलादेशातील संकट किती मोठं?
भारताच्या मदतीनं बांगलादेश निर्मिती झाली तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध चांगले होते. परंतु आता शेख हसीना सत्तेत नसल्याने भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. शेख हसीना या भारताच्या निकटवर्तीय मानल्या जायच्या त्यांचे सत्तेत राहणे भारतासाठी फायदेशीर होते. काही महिन्यांपूर्वी शेख हसीना चीन दौऱ्यावर गेल्या होत्या. परंतु तो दौरा अर्धवट सोडून त्या पुन्हा परतल्या. बांगलादेशात परतताच शेख हसीना यांनी मोठी घोषणा केली. बांगलादेशातील तीस्ता प्रोजेक्ट त्यात भारत आणि चीन दोघांनी गुंतवणुकीबाबत रस दाखवला परंतु भारताने हे पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आता शेख हसीना सरकार गेल्यानंतर भारतविरोधी सरकार बांगलादेशात येण्याची शक्यता आहे. खालिदा जिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामी यांचे सरकार बनू शकते. हे दोन्हीही इस्लामिक कंटरपंथीकडे झुकलेले आहेत. बीएनपी पक्ष भारतापेक्षा पाकिस्तानच्या जवळचे आहेत. त्यातून चीनला फायदा आहे कारण पाकिस्तान चीनचा चांगला मित्र आहे. इतकेच नाही तर हसीना यांचे सरकार दहशतवादावर संवेदनशील होते. भारताविरोधी दहशतवादी कारवायांना त्यांनी लगाम घातला होता. आता बांगलादेशातून घुसखोरीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
चीन घालतोय भारताला वेढा?
श्रीलंका दिर्घकाळापासून अस्थिरतेत आहे. त्यामागे चीनचा हात आहे. पाकिस्तान हा स्वातंत्र्यापासूनच भारताला शत्रू मानतो. म्यानमारमध्ये कित्येक वर्ष लष्करी राजवट आहे. मालदीवमध्ये मागील वर्षी मोहम्मद मुइज्जू राष्ट्रपती बनलेत जे चीन समर्थक मानले जातात. नेपाळमध्ये मागील महिन्यातच चीन समर्थक केपी शर्मा ओली पंतप्रधान बनलेत. भूतानच्या चहुबाजूने चीन कब्जा करत चाललंय. २०१७ मध्ये डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात ७६ दिवस तणाव राहिला होता.
भारत काय करतोय?
आपल्या शेजारील राष्ट्रांना सोबत घेणे आणि चीनला दूर ठेवणे यासाठी भारत शेजारील राष्ट्रांना खूप मदत करतो. भारताने २०२४-२५ बजेटमध्ये भारताशेजारील ७ राष्ट्रांना मदतीसाठी जवळपास साडे चार हजार कोटी निधी दिला आहे. पाकिस्तान सोडला तर भारताने सर्व शेजारील राष्ट्रांना मागील काही वर्षांत हजारो कोटी खर्च दिला आहे. दक्षिण आशियात चीन आणि भारत यांच्यात युद्धाचं मैदान तयार होतंय. बेल्ट अँन्ड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चीन सर्व दक्षिण आशियाई देशापर्यंत पोहचला आहे. असं करून चीनला भारताला चहुबाजुने कोंडीत पकडायचं आहे. यावेळी या देशांमधील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताला आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.