‘बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल’, शिवाजी पार्कमधील सभेवरून नरेंद्र मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:52 PM2024-03-18T19:52:17+5:302024-03-18T23:57:40+5:30
Narendra Modi News: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये रविवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी शक्तीवरून केलेल्या विधानाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये रविवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी शक्तीवरून केलेल्या विधानाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल शिवाजी पार्कमध्ये शक्तीचा विनाश करण्याची घोषणा होत होती. मी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मी विचार करू लागलो की, यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, काल शिवाजी पार्कमध्ये शक्तीचा विनाश करण्याची घोषणा होत होती. मी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मी विचार करू लागलो की, यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल. शिवाजी पार्क, ज्या भूमीवरील प्रत्येकजण जन्मापासून जय भवानी, जय शिवाजी’ हा मंत्रघोष करत मोठा होतो. त्या ठिकाणाहून शक्तीला संपवण्याची घोषणा केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी निघाले होते. त्याच शिवाजी पार्कमधून शक्तीच्या विनाशाची घोषणा केली जाते. त्यावेळी त्या मंचावर कोण बसले होते? हे पाहून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटले असेल, असा टोला नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
मोदी पुढे म्हणाले की, काल मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये इंडिया आघाडीने शक्तीला नष्ट करण्याची घोषणा केली आहे. जर त्यांना शक्तीला नष्ट करायचं असेल, तर शक्तीची पूजा करण्याचा आमचा संकल्प आहे. शक्तीवर वार म्हणजे महिला, मुली आणि भारत मातेवर वार आहे. आमच्या सरकारकडून महिला शक्तीला प्राधान्य दिलं जातं. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कुठल्याही सरकारने महिला शक्तीला एवढं प्राधान्य दिलं नव्हतं. तेवढं प्राधान्य आमच्या सरकारनं दिलं आहे. त्यामुळेच जेव्हा आमचं चंद्रयान-३ चंद्रावर उतरलं. तेव्हा त्या ठिकाणाला आम्ही शिवशक्ती असं नाव दिलं, असं नरेंद्र मोदीं यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, अनेक राजकीय जाणकार महिला शक्ती हे आमचे मतदार असल्याचे सांगतात. मात्र माझ्या देशातील महिला शक्ती ही केवळ मतदार नाबी तर माता शक्तीचं रूप आहे. महिला शक्तीचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठं कवच आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
काल मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या झालेल्या भारत जोडो न्या यात्रेच्या समारोप सभेमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, नरेंद्र मोदींविरोधातील आमची लढाई ही वैयक्तिक पातळीवर नाही आहे. मोदी एक मुखवटा आहेत जे शक्तीसाठी काम करतात. ते एक उथळ व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे ५६ इंची छाती नाही आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला होता, त्यालाच आता मोदींकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.