ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13- महाराष्ट्राचे माजी सैनिक महामंडळ (MESCO) आणि महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारानं पर्यटनाच्या दृष्टीनं 'वीर यात्रा' या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत पहिल्यांदाच सैनिकांच्या जीवनाचं ओझरतं दर्शन घडणार आहे.
MESCOचे एमडी कर्नल सुहास एस जाटकर यांच्या मते, लष्करी सामर्थ्य, त्याच्या गुंतागुंत , शौर्य , सुरक्षा, युद्धसामग्रीसह जगभरातल्या इतिहासाची माहिती या 'वीर यात्रे'मुळे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक भारतीयाला देशाच्या लष्करी सामर्थ्यावर नेहमीच गर्व असतो. पर्यटनाच्या दृष्टीनं तयार केलेली 'वीर यात्रा' पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीला मनात जीवनात कधी तरी आपणही लष्कराचा भाग असल्याचा विचार नक्कीच डोकावून जाईल.
'वीर यात्रे'च्या माध्यमातून सैनिकाच्या जीवनातील आकांक्षा, इतिहास, अनुभव लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचंही यावेळी कर्नल सुहास जाटकर यांनी म्हटलं आहे. मात्र या लष्करी पर्यटनाचं माजी सैनिकांकडून जोरदार प्रचार होणं गरजेचं आहे.
या लष्करी पर्यटनाची गोडी देशातल्या लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत निर्माण करण्याची गरज आहे. भारतीय लष्कराला भौतिक आणि भावनिक वारसा लाभला आहे. सर्व देशवासीयांनी याचा अभिमान राखणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन यावेळी कर्नल सुहास एस जाटकर यांनी केलं आहे.