नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
त्याचप्रमाणे परराष्ट्रीय मंत्री असताना त्यांनी ट्विटरवर सक्रिय राहून परदेशात राहणाऱ्या भारतीयांची मदत केली. त्यामध्ये व्हीजा संबंधित प्रश्न असो किंवा विमानतळावर फक्त एक ट्विटच पुरेसे असायचे. तसेच एकदा तर त्यांनी तुम्ही जरी मंगळ ग्रहावर अडकले असाल, तर तेथे देखील आम्ही मदत करु असे ट्विट करत त्यांनी सांगितले होते.
तसेच गीता नावाची एक मूक- बधिर भारतीय महिला जेव्हा पाकिस्तानात अडकली होती, तेव्हा सुषमा स्वराज यांनी तिच्या मदतीला धावून गेल्या व गीताला मायदेशात आणण्यात भारताला यश आले होते. त्याचप्रमाणे भारतीयांनाच नाही तर पाकिस्तानातील रहिवाश्यांना देखील त्यांनी मदत केली. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक मुलांना उपचारासाठी भारतात येण्यासाठी लागणारा व्हिजा त्यांनी उपलब्ध करुन दिला होता.