कलबुर्गी (कर्नाटक) : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सर्वत्र पराभव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा कसा देत आहेत, याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी आघाडी ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.
खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आहे, कारण लोक आता विशेषतः वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे नाराज आहेत. लोकशाही आणि भारतीय संविधानावर मोठा हल्ला केला जात आहे, असेही ते म्हणाले.
जनता प्रचंड नाराज असून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून भाजप सरकार चालवत आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज असून, विरोधी आघाडी ‘इंडिया’ला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडे मोठी संधी आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची पूर्ण क्षमता इंडिया आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
निकालासाठी ४ जूनची वाट पाहाजनतेला निकालासाठी ४ जूनची वाट पाहण्यास सांगून ते म्हणाले की, निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. इंडियाला किती जागा मिळतील असे विचारले असता, खरगे यांनी निश्चित संख्या सांगू शकत नाही. मी अशाप्रकारे मोजणी केलेली नाही, कारण राजकारणात अशी मोजणी फारच कमी होते. भाजपचा सर्वच राज्यांत पराभव होत आहे, असे खरगे पुढे म्हणाले.
त्यांना कळते कसे? पंतप्रधानांना हे कसे कळते की भाजप ४०० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे. कर्नाटकात आम्हाला २०१९ मध्ये एक जागा मिळाली. आता आम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळणार की नाही ते तुम्हीच सांगा. काँग्रेस चार जागा जिंकेल असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ही जागांची वाढ की घट, असे खरगे यांनी विचारले.
असे मांडले गणिततेलंगणात काँग्रेसला २०१९ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. येथे काँग्रेसच्या जागा वाढतील. केरळमध्ये आम्हाला जास्त जागा मिळतील.महाराष्ट्रात आमच्या आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळतील. राजस्थानमध्ये आम्ही शून्य होतो. यावेळी आम्हाला सात ते आठ जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात आमच्या जागा वाढतील. छत्तीसगडमध्ये आम्ही वाढत आहोत. मग ते कोणत्या आधारावर ४०० पारचा नारा देत आहेत?, असे ते म्हणाले.