ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 16 - खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर परवानगीशिवाय फोटो वापरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे स्पष्टीकरणही मागितले आहे. या प्रकरणाशी परिचित असणा-या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, खादी आणि ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर परवानगीशिवाय फोटो वापरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. या घटनेवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहीत विरोध पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली.
'परवानगीशिवाय सरकारी किंवा खासगी कंपन्यांच्या वतीने पंतप्रधानांचा फोटो छापल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. तसेच पंतप्रधानांना खूश करण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ असल्याचे दाखवण्यासाठी असे प्रकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही', अशी माहिती अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. रिलायन्स इंडस्ट्रिजची टेलिकॉम कंपनी 'जिओ' आणि 'पेटीएम'च्या जाहिरातीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो परवानगीशिवायच वापरण्यात आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवरुन यापूर्वीही महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यात आला नव्हता. 1996, 2002, 2005, 2011,2012, 2013 आणि 2016 या वर्षीही कॅलेंडरवर महात्मा गांधींजींचा फोटो नव्हता, असं स्पष्टीकरण केव्हीआयसीनं दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आणि खादीचे समर्थक असल्याने त्यांचा फोटो वापरण्यात आला, असे केव्हीआयसीतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. 'ऑक्टोबर 2016मध्ये मोदींनी लुधियानातील महिला विणकरांना 500 चरख्यांचे वाटप केले होते. या कारणामुळे कॅलेंडरवर मोदींचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला', अशी माहितीही या अधिका-याने दिली.
केव्हीआयसीचे अध्यक्ष वी.के. सक्सेना यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा केव्हीआयसीच्या मूल्यांशी मिळता जुळता आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खादीचा प्रसार अधिक वाढला आहे. यासाठी त्यांचा फोटोचा वापर करण्यात आला. सक्सेना यांनी असेही सांगितले की, 2015-16 वर्षात खादीची विक्री 34 टक्क्यांनी वाढली आहे, त्याआधी खादीची विक्री केवळ 2-7 टक्के इतकीच होत होती.