- यदु जोशी
आता अयाेध्येचा मेकओव्हर हाेत आहे. आतापर्यंत या शहराची अर्थव्यवस्था या शहरातील लोकांच्या हाती होती, पण आता जी नवीन अयोध्या उभी राहत आहे, तिची अर्थव्यवस्थाही आपल्याच हातात ठेवणे येथील मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांच्या हाताबाहेरचे आहे.
अरुंद गल्ल्या, घाणीचे साम्राज्य, दाटीवाटीने वसलेली घरे, रस्त्यांपासून इतर नागरी सुविधांची वानवा असे अयोध्येचे बकाल चित्र परवापर्यंत होते. प्रभू श्रीरामांना पुन्हा जन्म घ्यावासा वाटला तर अशा अयोध्येकडे पाहून ते दुसरीकडे जातील अशी टीका केली जायची. अस्वच्छ छोटी छोटी हाॅटेल्स, अतिक्रमण करून रस्त्यापर्यंत आलेले दुकानदार, त्यातून होणारी वाहतुकीची कोंडी, या सगळ्यातून मार्ग काढत रामलल्लांच्या दर्शनासाठी जाणारा देशभरातील भाविक ही आम परिस्थिती होती. आता भव्यदिव्य राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्येचा मेकओव्हर होणारच आहे, पण वर्षानुवर्षे अस्वच्छतेत रमलेली माणसे बदलणार आहेत का हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
स्वत:ला बदलण्याची तयारी अयोध्यावासियांनी केल्याचे तेथील लोकांशी बोलताना जाणवते. उत्तर प्रदेशातील माणूस गरीब आहे, साधा आहे पण चाणाक्ष आहे. आपले यापुढचे विश्व कसकसे बदलणार आहे याचा अंदाज त्याला आलाय अन् त्या दृष्टीने स्वत:ला बदलण्याची तयारीही त्याने केली आहे. आतापर्यंत या शहराची अर्थव्यवस्था या शहरातील लोकांच्या हाती होती, पण आता जी नवीन अयोध्या उभी राहत आहे तिची अर्थव्यवस्थाही आपल्याच हातात ठेवणे येथील मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांच्या हाताबाहेरचे आहे.
इथे आता बिग प्लेअर्स येऊ पाहत आहेत. मोठमोठ्या ब्रँडच्या शो रुम्स, खाद्य पदार्थांचे जगभरातील लोकप्रिय जॉईंट्स दारावर येऊन ठेपले आहेत. अशावेळी स्थानिक किरकोळ व्यापारी कसे टिकतील हा प्रश्न आहेच, पण छोटेखानी हॉटेल चालविणारे शरद पांडे यांनी त्याचे लाजवाब उत्तर दिले. कितीही मोठ्या गोष्टी येऊ देत सामान्य गोरगरीब भक्त तिथे जाणार थोडीच? ते तर आमच्याकडेच येतील ना? एक सांगू, रामलल्लांना सगळ्यांची काळजी आहे. गरीब ते अतिश्रीमंत असे सर्वच प्रकारचे भक्त इथे येणार आहेत. ५० हजार रुपये प्रति दवस रेटच्या खोल्या असलेले हॉटेल अन् एक हजार रुपये रोजाचे हॉटेल दोन्ही हाऊसफुल्ल राहतील, असे पांडे सांगतात. राम मंदिराकडे केवळ धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहता येणार नाही. दरवर्षी दोन कोटी भाविक या ठिकाणी येतील. त्यातून पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. म्हणूनच राम मंदिरासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्या ठिकाणी भव्य इस्पितळ उभारायला हवे होते असा तर्क देणाऱ्यांची इथे फिरल्यानंतर कीव करावीशी वाटते.
विकासाचा रामब्रँड
नागपूरचे एक गृहस्थ रामलखन तिवारी मूळचे उत्तर प्रदेशचे. मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच नागपुरातील आपली सारी संपत्ती विकून ते अयोध्येत स्थिरावले आहेत. आता स्वत:चे हॉटेल उभारत आहेत. रस्ता रुंदीकरणापासून अनेक विकासकामांसाठी येथील नागरिकांना जागा द्यावी लागली, मोबदला मिळाला. कोणीही विरोध केला नाही. कारण, आपली थोडी जागा गेली तरी त्या मोबदल्यात भविष्यात आपल्याला आणि आपल्यानंतरच्या पिढ्यांना काय मिळणार हे या लोकांना ठाऊक आहे.त्यातूनच अनेकांचे पाय आपल्या जन्मभूमीकडे पुन्हा वळले आहेत. धार्मिकतेबरोबरच विकासाचा रामब्रँड सगळ्यांनी ओळखला आहे, असे रामलखन तिवारी म्हणाले.
जमिनींना सोन्याचा भाव
अयोध्या व परिसरातील जमिनींना आता सोन्याचा भाव आला आहे. काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या ठिकाणी पाच बोटांत सहा अंगठ्या अन् गळ्यात सोन्याचे जाड गोफ घालणारे असे माफिया दिसतात. अयोध्येतही तसे चित्र दिसते. अर्थात माफियांचा बंदोबस्त योगी आदित्यनाथ बरोबर करतील आणि अशा प्रवृत्ती इथे फोफावणार नाहीत असे लोक विश्वासाने बोलून दाखवतात.
मठांचेही रूपडे पालटावेसंत-महंतांचे आखाडे म्हणजे आश्रम हे एक वेगळे आकर्षण आणि भक्तिकेंद्र आहेत. या मठांचे भक्त जगभर आहेत. राम मंदिराच्या भोवती केंद्रित होऊ पाहत असलेला सध्याचा विकास आपल्या मठांचे महत्त्व कमी तर करणार नाही ना अशी भीती मठाधीशांना वाटते. आता राम मंदिराच्या भव्यदिव्यतेसमोर आपले मठ झाकोळतील असे त्यांना वाटत आहे. आपल्या मठांचे व आसपासच्या भागाचे रुपडेही राज्य सरकारने पालटावे अशी त्यांची भावना आहे.