नवी दिल्ली : ‘जय श्री राम’चा नारा देणे हे गुन्हेगारी कृत्य कसे होते, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केला. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली.
याचिकेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १३ सप्टेंबरच्या आदेशाला आव्हान दिले होते. यात मशिदीच्या आत जय श्री राम नारे लावल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्धची कारवाई रद्द केली होती. तक्रारदार हैदर अली सीएम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने विचारले की, ते विशिष्ट धार्मिक घोषणा देत होते किंवा नावे घेत होते. हा गुन्हा कसा आहे? मशिदीत येऊन घोषणाबाजी करणाऱ्यांची ओळख कशी झाली, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला केली. याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी २०२५ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.