हरिष गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले. राजकारणात वजनदार नसताना, स्वत:चा कोणताही ठसा उमटविला नसताना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सततचा संपर्क नसताना त्यांना भाजपाने ही उमेदवारी दिली.त्यांची निवड होण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील दलित व्यक्तीच राष्ट्रपतीपदाची उमेदवार हवी होती. त्यांच्याखेरीज त्या राज्यात भाजपाकडे महत्त्वाचा दलित नेता नव्हता. मुरली मनोहर जोशी यांचे नाव चर्चेमध्ये होते. पण भाजपला दलित चेहराच हवा होता. जोशी १0९१ साली पक्षाध्यक्ष असताना रामनाथ कोविंद हे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील होते. नंतर सलग १२ वर्षे राज्यसभेवर ते होते.२0१४ साली मोदी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोविंद यांना प्रचाराची मोठी जबाबदारी दिली गेली. त्यानंतर ते मोदींचे विश्वासू नेते बनले. रा. स्व. संघाच्या नेत्यांनाही कोविंद यांच्या नावामुळे आश्चर्य वाटले आहे. मात्र, यूपीतील दलिताची निवड केल्याने संघ नेतेही गप्प बसले. थावरचंद गेहलोत आणि सत्यनारायण जतिया असे दलित चेहरे भाजपकडे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील होते व मोदींना यूपीचाच नेता हवा होता. बिहारचे राज्यपाल म्हणून कोविंद यांनी चित्रकुट येथील दिव्यांगांच्या पहिल्या विद्यापीठाला ३ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत विद्यापीठाचे संस्थापक जगद्गुरू राम भद्रचार्यजी यांनी कोविंद यांना खूप मोठे पद मिळेल, असा आशीर्वाद दिला होता. भद्रचार्यजी स्वत: अंध आहेत. स्वत: मोदी हेही भद्रचार्यजी यांचे शिष्य आहेत. अपंगांना दिव्यांग म्हणून संबोधण्यापासून, त्यांना विविध सुविधा देण्याचा सल्ला मोदी यांना त्यांच्याकडूनच मिळाला. राम भद्रचार्य यांना २0१५ साली पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. आपल्या उपस्थितीतीच कोविंद यांना भद्रचार्य यांनी आशीर्वाद दिला होता, असे भाजपचे उपाध्यक्ष खा. प्रभात झा यांनीही मान्य केले.
रामनाथ कोविंद यांची निवड झाली कशी?
By admin | Published: June 21, 2017 1:31 AM