कोलकाता - ममता बॅनर्जी गुरुवारी संध्याकाळी कालीघाट येथील त्यांच्या निवासस्थानी जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कपाळावर खोल जखम, नाकातून रक्त आणि डोक्याला मार लागला. तात्काळ ममता यांना शासकीय एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर टाके मारले आणि उपचार करून घरी पाठवले. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तब्येतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
परंतु ममता बॅनर्जी जखमी कशा झाल्या यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ममता बॅनर्जी स्वत:हून पडल्याचा दावा करण्यात आला, तर त्यांच्या वहिनीने कटाचा संशय व्यक्त केला. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्याने त्यांना दुखापत झाल्याचे दिसते. ममता बॅनर्जी यांच्या भावानेही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. ते घटनास्थळी नव्हते पण या घटनेवेळी त्यांच्या पत्नी घरीच होत्या त्यांनी हा प्रकार सांगितला.
संध्याकाळी ७.३० वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली होती. त्याठिकाणी डॉक्टरांनी ३ टाके लावले. तर नाकावरील जखमेवर उपचार करण्यात आले. सीटी स्कॅन, एमआरआयसह विविध चाचण्या करून रात्री ९.४५ वाजता त्यांना घरी पाठवण्यात आले. आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं की, हा एक अपघात होता अथवा ब्लड प्रेशरच्या चढउतारामुळे त्या खाली पडल्या हे शोधावे लागेल. ११ च्या सुमारास ममता बॅनर्जी यांच्या अपघातावर रुग्णालय संचालकांनी केलेल्या विधानामुळे संशय बळावला. कुणीतरी मागून ममता बॅनर्जींना जोरात धक्का दिल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांची वहिनी आणि तृणमूलच्या नगरसेविका कजरी बॅनर्जी यांनी या घटनेला कट असल्याचा दावा केला आहे. दीदी, धक्का लागल्यामुळे खाली पडल्या असं त्यांनी सांगितले. तर कजरी यांच्या पतीनेही मी तिथे उपस्थित नव्हतो. परंतु माझं पत्नीसोबत बोलणे झाले. जी दीदींसोबत रुग्णालयात होती. टेबलाचा कोना ममता बॅनर्जींना लागल्याचं सांगत आहेत. ममता बॅनर्जी या त्यांच्या बेडरूममध्ये खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. हे कसं झालं हे माहिती नाही कारण मी तिथे नव्हतो असं भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनी सांगितले.