नवी दिल्ली: नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली देशात भाजपचं सरकार आल्यापासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. भाजप अतिशय चाणाक्षपणे निवडणुकीचं नियोजन करत असताना काँग्रेस मात्र दिवसागणिक गलितगात्र होत चालली आहे. कधीकाळी संपूर्ण देशावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसचे आता केवळ दोन मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कामाला लागले आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यात त्यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठीची संपूर्ण योजना मांडली आहे.
२०१४ मध्ये भाजपसाठी रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आता काँग्रेससाठी काम सुरू केलं आहे. काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी यासाठी त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. किशोर यांनी सोनिया गांधींसमोर नुकतंच एक प्रेझेंटेशन दिलं. या प्रेंझेटेशनची सुरुवात महात्मा गांधींच्या एका विचारानं होते. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कधीही मरू देता कामा नये, ती केवळ देशासोबत मरू शकते.'
प्रशांत किशोर यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये भारताची लोकसंख्या, मतदारांची संख्या, विधानसभेच्या जागा, लोकसभाच्या जागा यांचे आकडे दिले आहेत. महिला, तरुण, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या संख्येचा उल्लेखदेखील यात आहे. २०२४ मध्ये १३ कोटी जण पहिल्यांदाच मतदान करतील. त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
सध्याची काँग्रेसची स्थिती काय?प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची सध्याची स्थिती प्रेझेंटेशनमधून मांडली आहे. त्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेत मिळून काँग्रेसचे ९० खासदार आहेत. विधानसभांमध्ये ८०० आमदार आहेत. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तीन राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत काँग्रेस सरकारमध्ये आहे. १३ राज्यांमध्ये काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. तर ३ राज्यांमध्ये काँग्रेस मित्रपक्षांसोबत मुख्य विरोधी पक्ष आहे.
काँग्रेसला सक्षम करण्याचे पाच उपाय१. नेतृत्त्वाचा विषय सोडवावा लागेल.२. आघाडीचा मुद्दा सोडवावा लागेल.३. पक्षाला जुन्या सिद्धांतांवर काम करावं लागेल.४. प्रत्यक्षात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्ते, नेत्यांची फौज तयार करावी लागेल.५. काँग्रेसच्या संवाद यंत्रणेत बदल करण्याची गरज