नवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’ देणा-या पतीला गुन्हेगार ठरवून, तीन वर्षे तुरुंगात टाकल्यावर तो पोटगी कशी आणि कुठून देणार, असा सवाल करून ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने ट्रिपल तलाकसंबंधीच्या केंद्राच्या प्रस्तावित कायद्यास विरोध केला आहे.लखनऊ येथे मंडळाच्या रविवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा झाली. हा कायदा महिलाविरोधी असून तो लागू केला, तर अनेक कुटुंबे उद््ध्वस्त होतील, असे मत व्यक्त केले गेले.मंडळाचे सदस्य सज्जाद नोमानी यांनी सांगितले की, हा मसुदा तयार करताना, संबंधितांशी चर्चा केली गेली नाही किंवा योग्य पद्धतीचा अवलंबही झाला नाही. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे हे मत पंतप्रधानांना कळवतील आणि हा कायदा आहे त्या स्वरूपात न करण्याची विनंती करतील. मंडळाचे सचिव मौलाना खालिद सैफुल्ला रेहमानी म्हणाले की, ‘ट्रिपल तलाक’च्या प्रथेला मंडळाचाही विरोध आहे. याविरुद्ध कडक कायदा असायला हवा, असे वाटते. परंतु हा कायदा ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरुंशी सल्लामसलत करून केला जायला हवा. ‘ट्रिपल तलाक’ हा गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणा-या कायद्याचे ‘मुस्लीम महिला (विवाहोत्तर हक्कांचे रक्षण) विधेयक’ सरकार येत्या आठवड्यात लोकसभेत मांडण्याची अपेक्षा आहे.
तीन वर्षे तुरुंगात गेल्यावर पती पोटगी कशी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:09 AM