नवी दिल्ली - 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' ही जाहिरात आपण पाहिलीच आहे. देशातील साक्षरता वाढीस लागावी, देशातील शिक्षण व्यवस्था उच्चतम आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी व्हावी, यासाठीही सरकारकडून प्रतत्न केले जातात. त्यासाठी, आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांमध्ये वाढ करण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील ४५ केंद्रीय विश्वविद्यालयांसह उच्च शिक्षणसंस्थांमध्ये मिळून एकूण ११ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
रिक्त असलेल्या संस्थांमध्ये IIT, IIM यांसारख्या गौरवशाली संस्थांचाही समावेश आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या केंद्रीय विश्वविद्यालयात, आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या संस्थांमध्ये ११ हजार वर्गांची पदे रिक्त आहेत. प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.
शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ४५ केंद्रीय विश्वविद्यालयात १८९५६ पदे स्विकृत आहेत. त्यात, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहप्राध्यापक यांची एकूण ६१८० पदे रिक्त आहेत. तर, देशाच्या आयआयटीतील ही आकडेवारी पाहिल्यास येथे एकूण ११,१७० पदे स्विकृत आहेत. त्यापैकी, ४५०२ पदे रिक्त आहेत. तसेच, आयआयएममध्ये शिक्षकांच्या१५६६ पैकी ४९३ पदे रिक्त आहेत.
दरम्यान, देशातील तीन वेगवेगळ्या केंद्रीय विश्वविद्यालयांतील पदांची भरती ही युजीसीच्या नियमांनुसार केली जाते. या रिक्त पदांवर भरती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वच शिक्षणसंस्थांना पत्रही लिहिले आहे, अशी माहिती प्रधान यांनी लोकसभेत दिली.