दत्ता पाटीलम्हाकवे: बंद पडलेले घड्याळ आता कर्नाटकातील निवडणूक रिंगणात उतरले आहे. प्रचारासाठी आज जयंत पाटील आले होते. तर शरद पवार ही येणार असल्याचे समजते. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या निपाणी मतदार संघ सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. तुम्हाला सोडून लोक चालले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवादीने अगोदर घर सांभाळावे असा कानमंत्र देत केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढविला.निपाणी येथे निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी उपस्थित होत्या.निपाणी मतदार संघातील मतदारांना शशिकला जोल्ले यांना निवडून देवून हॅट्रिक साधायची असताना बंद पडलेले घड्याळ आणि कर्नाटकात पिछेहाट झालेली काँग्रेस पक्ष खोडा घालत आहे. परंतु, एक नारी सभपे भारी है असल्याचे त्या म्हणाल्या.मोदींचे हात बळकट करा... कोरोना काळात जीव धोक्यात घालून आमदार शशिकला जोल्ले या लोकांना धीर देत होत्या. यावेळी येथील अनेक नेते मंडळी घरात होते. तर या काळात पंतप्रधान मोदींनी गरिबांना मोफत धान्य, औषध पुरवठा केला. तसेच, प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस दिले. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी मतदान पेटीतून विरोधकांना इंजेक्शन द्या. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या घरच्या मुलीचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना हद्दपार करा असे आवाहनही मंत्री इराणी यांनी केले.३ हजार युवकांना रोजगार देणार : जोल्ले बिरेश्वर बँकच्या १०० नव्या शाखांना मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून दीड हजार तर हालसिध्दनाथ साखर कारखान्यांमध्ये बाराशेहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या नोकऱ्या निपाणी परिसरातील बेरोजगार तरुणांना देणार असल्याचे शशिकला जोल्ले यांनी सांगितले.स्वागत विभावरी खांडके यांनी केले. सुञसंचालन सोनल कोटडीया यांनी केले. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव माने, निता बागडे, राजु बुंदेशा, अजित गोपचाळ, वृषभ जैन, पवन पाटील यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:41 PM