गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीचे अधिकारी लोकांना घाबरवून, दमदाटी करून आपविरोधात जबाब देण्यास भाग पाडत आहेत, असा दावा आतिशी यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आतिशी म्हणाल्या की, आज सकाळी १० वाजता ईडीाबबत मी मोठा गौप्यस्फोट करणार आहे, असं काल मी ट्विटरवरून सांगितलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाला घाबरवण्यासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून आम आदमी पक्,ाशी संबंधित लोक आणि नेत्यांच्या घरांवर ईडीने छापेमारी केली आहे. आमचे नेत एन.डी. गुप्ता यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. त्यांच्या पीएच्या घरावरही छापा मारण्यात आला आहे. आज दिवसभरात ईडी आपच्या अनेक नेत्यांच्या घरांवर छापे मारणार आहे, अशी वार्ता कानावर येत आहे, असा आरोपी आतिशी यांनी केला,
मात्र आम्ही या सर्वाला घाबरणार नाही. आतापर्यंत एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. आतापर्यंत कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत. हा संपूर्ण खटला ईडीकडून आरोपींना सरकारी साक्षीदार बनवून उभा केला जात आहे. ईडीने बनाव रचून या जबान्या घेतल्या आहेत, असा आरोप आतिशी यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, लोकांना दमदाटी करून घाबरवून चुकीच्या जबाबांवर स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. एका साक्षीदाराने सांगितले की, ईडीच्या एका अधिकाऱ्याने एवढ्या जोरात कानाखाली मारलं की माझ्या कानाचं पडदा फाटला. तर दुसऱ्या एकाने सांगितले की, आपच्या नेत्यांविरोधात साक्ष दिली नाही तर तुझी मुलगी शाळेत कशी जाते हे बघून घेऊ, तुझ्या पत्नीचं अपहरण करू, अशी धमकी ईडीकडून देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने २०२० च्या आदेशामध्ये सांगितलंय की, कुठल्याही प्रकरणातील चौकशी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर झाली पाहिजे. हा निकाल ईडीवरही लागू होतो. तसेच केवळ व्हिडीओ नाही तर चौकशीचा ऑडिओसुद्धा उपलब्ध असला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडियो मिळावा, हा प्रत्येक आरोपी आणि साक्षीदाराचा अधिकार असतो. एका आरोपीने जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ यांची मागणी केली. तेव्हा तपासावेळी दिलेली साक्ष आणि कोर्टात दिलेली माहिती यामध्ये विसंगती असल्याचे दिसून आले. ईडीने जेव्हा आरोपीला फुटेज दिलं तेव्हा त्यामधील ऑडिओ डिलीट करण्यात आला होता. दरम्यान, कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केल्यापासून गेल्या दीड वर्षांपासूनचा सर्व तपास, प्रश्नोत्तरे या सर्वांचं ऑडिओ फुटेज डिलीट केलं आहे, असा आरोप आतिशी यांनी केला.
ईडीने कोर्टात सादर केलेल्या सर्व साक्षी बनावट आहेत. ईडीच्या तपासामध्येच घोटाळा झालेला आहे. जर या साक्षी बनावट नसत्या तर ऑडिओ डिलीट करण्याची वेळ आली नसती, असा दावाही आतिशी यांनी केला.