नवी दिल्ली - ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची चर्चा सध्या भारत आणि अमेरिकेसोबतच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये देखील सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकाच मंचावर आल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या कार्यक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी देखील घेतली आहे. अमेरिका आणि युरोपमधील बहुतांश प्रसारमाध्यमांनी हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. पण पाकिस्तान, चीन आणि मध्य आशियामधील काही प्रसारमाध्यमांनी मात्र या कार्यक्रमाच्या आणि मोदींच्या विरोधातील घटनांना ठळक प्रसिद्धी दिली आहे. यूएस टुडे - हा तर मोदी-ट्रम्प यांचा ब्रोमांस हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी ह्युस्टनमध्ये लक्षणीय उपस्थिती दिसून आली. दरम्यान, मोदी आणि ट्रम्प हे एकत्र मंचावर आल्यावर उपस्थितांनी मोदी मोदी असे नारे देण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचा जागतिक स्तरावरील नेते म्हणून उल्लेख केला. तर मोदींनी डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे मित्र असल्याचे सांगितले. त्याआधारावर भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी ब्रोमांस दाखवला. असे यूएस टुडेने म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल - हा तर भारत आणि अमेरिकेलीत सण ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमात दोन्ही देशांनी आपली स्वप्ने आणि उज्ज्वल भवितव्याबाबतचे विचार एकमेकांसमोर मांडले. नरेंग्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची हाऊडी मोदी कार्यक्रमात झालेली भेट आणि हा कार्यक्रम हा दोन्ही देशांसाठी एखाद्या सणासारख्या होता. सुमारे 50 हजार लोकांसमोर अमेरिकेले भारतातील विविधता पाहिली, असे गौरवोदगार वॉल स्ट्रीट जर्नलने काढले. वॉशिंग्टन पोस्ट - ट्रम्प अहंभाव सोडून मोदींसोबत आले एकाच मंचावर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरून सध्या अमेरिकेमध्येच तणाव निर्माण झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार हे त्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र यावेळी ट्रम्प यांनी अहंकार बाजूला ठेवला आणि ते मोदींसोबत एकाच मंचावर गेले. दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
बीबीसी - ट्रम्प म्हणाले, मोदींची ही सभा ऐतिहासिक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ह्युस्टन येथील सभा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. हाऊडी मोदी हा अमेरिकेच्या इतिहासातील कुठल्याही परदेशी नेत्याचा सर्वात मोठा कार्यक्रम होता. या सभेमुळे दोन्ही देशांच्या नेत्यांना त्याच्या त्यांच्या देशात मोठा फायदा होणार आहे, असे बीबीसीने म्हटले आहे. द गार्जियन : हाऊडी मोदीमध्ये नाही दिसले भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी युद्ध हाऊडी मोदी कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे हातात हात गुंफून स्टेडियममध्ये आले. तसेच एकत्रच मंचावर गेले. त्यामधून ही जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील मैत्री आहे, असा संदेश जगभरात गेला. त्यांच्यामध्ये व्यापारी युद्धाची कुठलीही छटा दिसून आली नाही, असे द गार्जियनने म्हटले आहे. अल जझिरा - हाऊडी मोदी कार्यक्रम सुरू असताना स्टेडियमबाहेर मोदींविरोधात आंदोलन ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम सुरू असताना स्टेडियमबाहेर मात्र हजारो लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात आंदोलन करत होते, असे वृत्त अल जझिराने दिले आहे. चायना डेली - काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण तरीही मोदी घेताहेत ह्युस्टनमध्ये सभा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती असताना ह्युस्टनमध्ये सभा घेत आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना सोबत करत आहे. एकीकडे दोन्ही नेते एकमेकांचे कौतुक करत होते. मात्र बाहेर काश्मीर प्रश्नावरून हजारो लोक आंदोलन करत होते. डॉन - ट्रम्प-मोदी मैत्री दाखवत असताना बाहेर करत होते आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हाऊडी मोदी कार्यक्रमात मैत्रीच्या चर्चा करत असताना स्टेडियमबाहेर मात्र काही लोक काश्मीर प्रश्नावरून आंदोलन करत होते. आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये विविध समुदायातील लोकांचा समावेश होता, असा दावा पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनने केला आहे.