अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमस्थळी जवळपास 50 हजारांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. एनआरजी स्टेडियम खचाखच भरलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना मोदींनी आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध केलं. मात्र कार्यक्रमानंतर सभागृहातून बाहेर जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहातून बाहेर जात असताना तेथील उपस्थित असलेल्या लहान मुलांनी त्यांच्याकडे सेल्फी काढण्याची मागणी केली. त्यांनंतर दोघांनी देखील मोकळ्या मनाने त्या लहान मुलासोबत सेल्फी काढल्याने नेटकऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीं म्हणाले की मी त्यांचे नेतृत्व, अमेरिकाबद्दलची त्यांची प्रबळ इच्छा व अमेरिकेची वाटणारी चिंता याबाबत मी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा केली होती. तसेच जेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याचे मोदींनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळात 30 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मोदींनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे. भारत आणि अमेरिकेच्या संविधानातही बरंच साम्य असल्याचं ते म्हणाले. मोदी व्हाईट हाऊसचे अतिशय विश्वासू मित्र आहेत. मोदींना ट्रम्पपेक्षा चांगला मित्र मिळणार नसल्याचे देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत एक मजबूत देश म्हणून वाटचाल करत असल्याचे कौतुकोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले. मोदींमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले असल्याचं ते म्हणाले. उज्ज्वल भविष्य हे दोन्ही देशांचं स्वप्न आहे. दोन्ही देश इस्लामिक कट्टरतावादाचा मिळून सामना करतील, असंदेखील ट्रम्प म्हणाले. यानंतर ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 50 हजार अनिवासी भारतीयांनी टाळ्यांचा कडकडाट केला.