निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात या निवडणुकीसंदर्भातील तारखांची घोषणा केली. भाजपशासित हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातच, सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी ओपिनियन पोल घेतला आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या 37 वर्षांपासून एकदा भाजप आणि एकदा काँग्रेसचे सरकार येते. येथील लोक दर पाच वर्षांनंतर सरकार बदलतात.
जयराम ठाकूर यांच्या कामावर किती लोक खूश?ओपिनियन पोलनुसार, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या कामावर बहुतांश लोक खूश आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम कसे आहे, यावर ३८ टक्के लोकांनी ‘चांगले’ असल्याचे म्हटले आहे. 29 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांचे काम सरासरी तर 33 टक्के लोकांनी खराब असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच एकूण 71 टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर समाधानी आहेत.
कुठल्या पक्षाला किती टक्के मते?सी-व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, हिमाचलमध्ये तब्बल 37 वर्षांपासून सरकार बदलण्याची प्रथा यावेळी तुटण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार भाजपला 46 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 35.2% मते मिळू शकतात. आम आदमी पक्षाला केवळ 6.3 टक्के मतांवरच समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना 12.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
कुठल्या पक्षाला किती जागा? -ओपिनियन पोलनुसार, हिमाचलमध्ये भजपला 38-46 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 20-28 जागांवर विजय होण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला केवळ 0-1 जागेवरच समाधान मानावे लागू शकते. तर इतरांच्या खात्यात 0-3 जागा जाऊ शकतात.
मुख्यमंत्र्यांच्या रुपात पहिली पसंती कुणाला? - सर्वेक्षणात, मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या पसंतीसंदर्भात विचारले असता, 32 टक्के लोकांनी जय राम ठाकूर सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. 26 टक्के लोकांनी अनुराग ठाकूर यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडे असे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या प्रतिभा सिंह यांना 18 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी इतर चेहरा बघायला आवडेल असे म्हटले आहे.