नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील तालकटोरा स्टेडिअममध्ये 16 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली 'परीक्षा पर चर्चा' ऐकली की नाही यासाठी आता शाळांकडून रिपोर्ट मागवण्यात आला आहे. पुरावा म्हणून शाळांना फोटो आणि व्हिडीओ सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील सर्व सरकारी शाळांना यासंबंधी सूचना केली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे पुरावा जमा करण्याचा आदेश शाळांना देण्यात आला आहे. देशभरातील सर्व शिक्षण विभागांना 19 फेब्रुवारीला परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
जिल्ह्यातील सर्व मुख्य शिक्षण अधिका-यांना पाठवण्यात आलेल्या या परिपत्रकात त्यांना आपल्या हद्दीत येणा-या शाळा , विद्यार्थी ज्यांनी पीएमओ वेबसाईट, एमएचआरडी, दूरदर्शन, इंटरनेटच्या किंवा अन्य माध्यमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं त्यांची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने मात्र शाळांना असा कोणताही अहवाल देण्यास सांगितलं नसल्याचा दावा केला आहे. ही नेहमीती प्रक्रिया असून, यामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही. दुसरीकडे तामिळनाडूच्या शिक्षण विभागातील मुख्य अधिका-याने मंत्रालयातून राज्यातील सर्व शाळांना फॉर्म पाठवण्याचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. 16 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या शाळकरी आयुष्यातील अनेक मजेशीर किस्से सांगितले. शाळेत असताना विद्यार्थी सरस्वती देवीला पुजतात, मात्र मी हनुमानाची पूजा करायचो अशी आठवण त्यांनी सांगितली.
आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र, तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले.
मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. आयुष्यात स्वत:मधला विद्यार्थी कधीच मरून देऊ नका, त्यामुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
मी शाळेत असताना इतरांना विनोद सांगायचो. परंतु, त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट तेव्हा मला समजली होती. आत्मविश्वास ही जीवनात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मात्र, आत्मविश्वास म्हणजे बाजारात मिळणारे औषध नव्हे जे एखादी आई परीक्षेच्या दिवशी आपल्या मुलाला देईल. स्वामी विवेकानंद नेहमी एक गोष्ट सांगायचे. ३३ कोटी देवीदेवतांची पुजा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर ३३ कोटी देवही तुमची मदत करु शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आत्मविश्वास नसेल तर तुमची मेहनत वाया जाते, तुम्हाला परीक्षेत उत्तर येत असेल पण आत्मविश्वासाअभावी आठवणार नाही, त्यामुळे जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कमावण्यासाठी इतरांशी नव्हे तर स्वत:शीच स्पर्धा करा आणि मेहनत करा, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तसेच पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये, असा सल्लाही मोदींना दिला. आई-वडील दुसऱ्यांशी आमची तुलना करतात, या दबावातून आम्ही चांगली कामगिरी करु शकत नाही. अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून मोदींना विचारण्यात आला. यावर मोदी म्हणतात, तुम्ही मित्र-मैत्रिणींशी स्पर्धा का करता. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे हे समजून घ्या. दुसऱ्याचे अनुकरण करताना तुमच्या पदरी निराशाच येते. तुमची बलस्थाने ओळखा आणि त्याच दिशेने पुढे जात राहा, असा सल्ला त्यांनी दिला.