ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीतले आठ आमदार हरयाणातल्या एका हॉटेलमध्येभाजपाकडून आमदारांच्या खरेदीचे प्रयत्न होत असल्याचा काँग्रेसचा आरोपकाँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, हॉटेलमधल्या आमदारांशी संबंध नाही; भाजपाचा दावा
भोपाळ: सत्ताधारी काँग्रेस आघाडीतले आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. भाजपानं या आमदारांना ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. मानेसरमधल्या हॉटेलमध्ये असलेल्या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह यांच्या गटातला आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह सध्या दिल्लीत आहेत. मानेसरच्या हॉटेलमध्ये असलेले सर्व आमदार काँग्रेसचे असल्याचं पटवारी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. 'दिग्विजय सिंह सध्या हॉटेल बाहेर आहेत. मात्र पोलीस त्यांना आता सोडायला तयार नाहीत,' असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपा नेते नरोत्तम मिश्रा आणि माजी गृह मंत्री भूपेंद्र सिंह आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शिवराज सिंह चौहान यांना सत्तेची हाव आहे. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून कटकारस्थानं आखली जात आहेत. मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. आम्ही हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहोत. मीदेखील त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे. बहुजन समाज पार्टीच्या आमदार रमाबाई माझ्यासोबतच आहेत, अशी माहिती पटवारी यांनी दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काल सकाळीच ट्वीट करुन भाजपाचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह आमदार रमाबाई यांना चार्टर्ड विमानानं दिल्लीला गेल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस, समाजवादी, बसपाच्या आमदारांना दिल्लीला नेण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी ट्वीटमध्ये केला होता. रमाबाई मुलीच्या उपचारांसाठी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांचे पती गोविंद सिंह यांनी दिली. रमाबाई कमलनाथ सरकारसोबतच असल्याचंही त्यांनी सांगितलं.