राजकीय पक्षांच्या संपत्तीत प्रचंड वाढ; भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष नेमका कोणता?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:08 AM2023-09-06T08:08:25+5:302023-09-06T08:09:14+5:30
प्रमुख ८ राष्ट्रीय पक्ष : २०२१-२२ या आर्थिक वर्षात निवडणूक यंत्रणेकडे आर्थिक संपत्तीविषयीची माहिती जमा केली. या आधारे एडीआरचा अहवाल...
मुंबई : देशात कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली. लाखो नागरिकांनी परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी घरातील सोने, ठेवी विकल्या. दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. २०२१ ते २०२२ दरम्यान देशातील ८ प्रमुख राष्ट्रीय पक्षांची संपत्ती तब्बल ८ हजार ८२९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०२०-२०२१ मध्ये ही संपत्ती ७ हजार २९७ कोटी रुपये होती. सर्वाधिक संपत्ती ही भाजपची वाढली आहे.
भाजपची संपत्ती किती वाढली?
भाजपची संपत्ती २०२१-२२मध्ये ६,०४६.८१ कोटी इतकी आहे. त्याआधीच्या वर्षी हाच आकडा ४,९९० कोटी इतका होता. त्यामुळे २०२१-२२ या वर्षी भाजपच्या संपत्तीमध्ये २१.१७ टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात दिसून येते.
काँग्रेसची एकूण संपत्ती किती?
भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. ही वाढ १६.५८ टक्के आहे. त्यामुळे पक्षाची एकूण संपत्ती ६९१.११ कोटींवरून ८०५.६८ कोटींवर पोहोचली आहे.
तृणमूलकडे किती पैसे?
२०२०-२१मध्ये तृणमूल काँग्रेसची एकूण संपत्ती १८२.००१ कोटी इतकी होती. त्यात १५१.७० टक्क्यांची वाढ झाली! अर्थात हा आकडा ४५८.१० कोटींपर्यंत पोहोचला.
कोणत्या पक्षाची संपत्ती घटली?
बसपा हा या ८ पक्षांमधला एकमेव पक्ष आहे ज्याची संपत्ती याच काळात वाढली नसून घटली आहे. ही घट ५.७४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. यानुसार त्यांची संपत्ती ६९०.७१ कोटींवरून ७३२.७९ कोटी झाली आहे.