पुतण्या गेटवर हॉर्न देत राहिला, काकांनी करेक्ट कार्यक्रम केला; बिहारमध्ये महाराष्ट्रातील घडामोडींची पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 02:39 PM2021-06-14T14:39:43+5:302021-06-14T14:42:41+5:30
बिहारमध्ये महाराष्ट्राचा सारखाच घटनाक्रम; टप्प्यात येताच काकांकडून पुतण्याचा करेक्ट कार्यक्रम
पाटणा/नवी दिल्ली: काका-पुतण्याची जोडी आणि त्यांचं राजकारण महाराष्ट्रसाठी नवीन नाही. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींदरम्यान काका-पुतण्याचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा शपथविधी, त्यानंतर जवळपास ८० तासांत कोसळलेलं सरकार, शरद पवारांनी फिरवलेली सूत्रं आणि महाविकास आघाडी सरकार हा घटनाक्रम राज्यानं पाहिला आहे. आता बिहारमध्ये काका-पुतण्याचं राजकारण सुरू आहे. यामध्येही काकांचीच सरशी होताना दिसत आहे.
भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?
लोकसभेत लोक जनशक्ती पक्षाचे ६ खासदार आहेत. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान त्यांचे गटनेते होते. मात्र इतर ५ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांना गटनेते पदावरून हटवण्याची मागणी केली. ती मान्य झाली. त्यामुळे पशुपती कुमार पारस आता पक्षाचे लोकसभेतील गटनेते असतील. चिराग पासवान पक्षात राहू शकतात, असं म्हणत पारस यांनी चिराग यांनाच पक्षात राहण्याची ऑफर दिली. त्यामुळे स्वत:च अध्यक्ष असलेल्या पक्षात चिराग यांची अवस्था वाईट झाली आहे.
शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?
चिराग गेटवर, पत्र लोकसभा अध्यक्षांकडे
लोकसभेच्या गटनेते पदावरून चिराग पासवान यांना हटवून त्यांच्याऐवजी पशुपती पारस यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारं पत्र पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. विशेष म्हणजे हे सगळं होत असताना चिराग दिल्लीत असलेल्या पारस यांच्या निवासस्थानी पोहोचले. काकांची समजूत काढण्यासाठी चिराग त्यांच्या घरी गेले. मात्र जवळपास २० मिनिटांहून अधिक वेळ गेट उघडलाच गेला नाही.
पारस यांच्या निवासस्थानी पोहोचून गेटवर थांबलेले चिराग २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ हॉर्न देत होते. अखेर गेट उघडला गेला. पण पारस निवासस्थानी नव्हतेच. याच दरम्यान पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र सुपूर्द केलं. त्यामुळे आता पारस लोकसभेत पक्षाचे गटनेते असतील. तर चिराग पासवान स्वत:च्याच पक्षात अडचणीत आले आहेत. काकांनी डाव साधल्यानं त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवरच घाव घातला गेला आहे.