देहराडून - शैल पर्वत क्षेत्रातील गंगोलीहाट गुहांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सिद्धपीठ हाटकालिका मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर आठ तळ असलेली एक विशाल गुहा सापडली आहे. या गुहेच्या आतमध्ये विविध पौराणिक चित्रे कोरलेली आहेत. तर येथील शिवलिंगावर नैसर्गिकरित्या जलाभिषेक होत आहे. ही गुहा चार स्थानिक तरुणांनी शोधून काढली असून, तिला महाकालेश्वर असे नाव दिले आहे. ही गुहा प्रसिद्ध पाताल भुवनेश्वर गुहेपेक्षा मोठी असू शकते.
रविवारी गंगोलीहाटच्या गंगावली वंडर्स ग्रुपचे सुरेंद्र सिंह बिष्ट ऋषभ रावल, भूपेश पंत आणि पप्पू रावल यांनी गुहेत प्रवेश केला. गुहेचा आकार पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सुरेंद्र यांनी सांगितले की, ते आधी सुमारे ३५ फूट खोल खाली उतरले. त्यानंतर त्यांना नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या सुमारे आठ फुटांच्या पायऱ्या मिळाल्या. पुढे गेल्यावर ते अशा प्रकारे आठ माळ्यांपर्यंत शिड्या आणि सपाट भागावरून ते पुढे गेले. येथे नववा माळाही होता, मात्र ते तिथे पोहोचू शकले नाहीत. ही सुहा सुमारे २०० मीटर लांब आहे.
या भागातील इतर गुहांप्रमाणेच येथील भिंतींवरही पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. तर येथील शिवलिंगावर नैसर्गिकरीत्या जलाभिषेक होत आहे. आतापर्यंत सापडलेल्या गुहांमध्ये ही सर्वात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेमध्ये पुरेसा ऑक्सिजन आहे. ही गुहा येथील पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकते.
गंगावली क्षेत्रातील शैल पर्वताच्या शिखरावर मानस खंडामध्ये २१ गुहांचा उल्लेख आहे. त्यापैकी १० गुहांचा शोध लागला आहे. सिद्धपीठ हाट कालिका मंदिराच्या आसपास रविवारी सापडलेल्या गुहेशिवाय तीन इतरही गुहा असल्याचे संकेत मिळत आहेत.
आतापर्यंत पाताळ भुवनेश्वर, कोटेश्वर, भोलेश्वर, महेश्वर, लाटेश्वर मुक्तेश्वर, सप्तेश्वर, डाणेश्वर, भुगतुंग (भृगु संहिता इथे लिहिली गेली असे मानले जाते) अशा गुहा सापडल्या आहेत. दरम्यान, नव्याने सापडलेल्या गुहेचा शोध घेण्याऱ्यांनी तिचे नामकरण महाकालेश्वर असे केले आहे. दरम्यान, आता या गुहेची पाहणी करण्यासाठी माजी भूगर्भतज्ज्ञ व्ही. एस. कोटलिया हेसुद्धा येण्याची शक्यता आहे.