भारतीय हवाई दलाच्या बाहुंमध्ये प्रचंड ताकद आली आहे. सोमवारी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हवाई दलाच्या सेवेत रूजू झाले. या हेलिकॉप्टरचे नाव प्रचंड असे ठेवण्यात आले आहे. यामुळे हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. हे स्वदेशी हेलिकॉप्टर असून मिनिटाला ७५० गोळ्या झाडण्याची ताकद या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एअरबेसवर याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी योद्ध्यांच्या राजस्थानात हे हेलिकॉप्टर भारताच्या सेवेत आले आहे. यासाठी नवरात्रीपेक्षा चांगली वेळ कोणती असूच शकत नाही, असे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मार्चमध्ये बैठक झाली होती. या मंत्रिमंडळ बैठकीत अशाप्रकारची १५ हेलिकॉप्टर बनविण्यासाठी 3887 कोटी रुपये आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 377 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी १० हेलिकॉप्टर हवाई दलाला आणि ५ हेलिकॉप्टर ही सैन्याला देण्यात येणार आहेत. येत्या काही वर्षांत दोन्ही दलांना 160 एलसीएचची गरज आहे. सैन्यालाच ९५ हेलिकॉप्टर लागणार आहेत. ही हेलिकॉप्टर उंच भागात तैनात केली जाणार आहेत. पुढील महिन्यात काही हेलिकॉप्टर सैन्याला देखील मिळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्सने ही हेलिकॉप्टर तयार केली आहेत. वजन 5.5 टन आहे. यामध्ये दुप्पट शक्तीची इंजिन लावण्यात आली आहेत. याचा वापर युद्धात तसेच देशातील बंड आणि बचाव कार्यात केला जाऊ शकतो. हवाई दलात समाविष्ट होण्यापूर्वी हे हेलिकॉप्टर लडाख आणि वाळवंटावरून उडताना दिसले आहेत. चीन सीमेजवळ असलेल्या परिसरातही ते उडताना दिसले आहेत.