नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. पोलिसांनी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर जगभरातून आंदोलनाची दखल घेतली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं आणि पॉप स्टार रिहाना हिनेही (Greta Thunberg) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे.
केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र, दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतकऱ्यांचाच उद्योग-व्यवसाय आहे. भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण, शेती या उद्योगावरही आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने 3 शेतकरी कायदे केले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
माझ्या संसदेतील भाषणात मी हिंदीत म्हटलो होतो, हम दो हमारे दो... म्हणजे सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी हम दो हमारे दो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा आणि उद्योगपती अनिल अंबानी व गौतम अदानी यांचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली होती.
इंधन दरवाढीवरुनही भडकले राहुल गांधी
"तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे.