पाटणा: बिहारच्या अररियामध्ये भारत-नेपाळ सीमेवर मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. जोगबनी येथील सीमेवर नेपाळी लष्कराला २८ मानवी सांगाडे आढळून आले आहेत. एका व्हॅनमध्ये हे सांगाडे सापडले. लष्कराकडून वाहनांची तपासणी सुरू असताना सांगाडे सैन्याच्या हाती लागले.
भारत-नेपाळ सीमा कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होती. ती नुकतीच खुली करण्यात आली. या परिस्थितीत दोन्ही देशाच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दोन्ही बाजूला वाहनांची कसून तपासणी होत आहे.
४ ऑक्टोबरला संध्याकाळी उशिरा एक व्हॅन भारतातून नेपाळमध्ये जात होती. नेपाळच्या सीमेवर पोहोचताच वाहनाची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात मानवी सांगाडे आढळून आले. मानवी सांगाडे पाहताच उपस्थित सैनिकांना धक्काच बसला. व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी कवटी आणि जांघेची हाडं सापडली. ही हाडं प्राण्यांची असावीत असा कयास सुरुवातीला लावण्यात आला. मात्र नंतर ती हाडं माणसाची असल्याची माहिती समोर आली.
सीमा सुरक्षा दलाकडून भारतीय हद्दीचं संरक्षण करण्यात येतं. सांगाडे आढळून आलेली व्हॅन भारतीय हद्दीतून गेली नसल्याचं सीमा सुरक्षा दलानं सांगितलं. हे प्रकरण अतिशय संवेदनशील मानलं जात आहे. सीमा सुरक्षा दलानं अलर्ट जारी केला असून नेपाळी सैन्यानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.