मध्य प्रदेशच्या इंदूरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सोमवारी एका साध्वीच्या बॅगमध्ये मानवी कवटी आणि अस्थि आढळून आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. साध्वीच्या बॅग्सची स्कॅनिंग होत असताना बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आली. त्यानंतर तात्काळ याची पोलिसांना माहिती देण्यात आली. संबंधित सामान घेऊन जाण्यासंदर्भात कोणतीही परवानगी नसल्यामुळे ते जप्त करण्यात आलं तर साध्वीला दिल्लीला रवाना होऊ देण्यात आलं.
विमानतळावर तैनात सुरक्षा अधिकारी मानवी कवटी बॅगमध्ये असल्याचं पाहताच हैराण झाले होते. बॅग एका साध्वीची असल्याचं कळाल्यानंतर त्याबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. धर्म नगरी म्हणून ओळख असलेल्या उज्जैमधील एका आश्रमातील साध्वी योगमाता दिल्लीसाठी विमानानं रवाना होणार होत्या. त्यासाठी त्या स्थानिक विमानतळावर पोहोचल्या होत्या. प्रवाशांच्या तपासणीच्या प्रक्रिये अंतर्गत विमानतळावर साध्वी यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या सामनाचीही तपासणी केली गेली. विमानतळावरील स्कॅनरमध्ये साध्वींच्या एका बॅगमध्ये मानवी कवटी असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता साध्वीनं संबंधित कवटी आपल्या दिवंगत धर्मगुरूची असून तिचं विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अशापद्धतीचं कोणतंही सामान घेऊन जाण्यासाठी सुरक्षा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी साध्वींकडून घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेनं संबंधित सामान घेऊन जाण्यास साध्वींना मज्जाव केला. साध्वींचा जबाब नोंदविण्यात आला आणि त्यांना सामानाविना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.
दिल्लीला रवाना होणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं साध्वीनं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर साध्वींनी आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीला विमानतळावर बोलावलं आणि मानवी कवटी, अस्थि संबंधित व्यक्तीकडे सोपवलं. त्यानंतर त्या कोणत्याही सामानाविना दिल्लीसाठी रवाना झाल्या. सर्व सुरक्षा चौकशांना सामोरं गेल्यानंतर साध्वींना रात्री उशिराचं विमानाचं तिकीट नियोजित करुन देण्यात आलं. त्यानंतर त्या रवाना झाल्या.