मुंबई - कोरोना काळात आपण पावलोपावली माणूसकी पाहिली, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी, रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी झटणारे हात आपण पाहिले. त्यामुळेच, कोरोनाच्या लढाईला बळ मिळालं. एककीडे कोरोनाग्रस्त रुग्णांची काही रुग्णालयांकडून लूट होत होती. पण, दुसरीकडे अशीच एखाद्याच्या मदतीचा व्हिडिओ पाहून ही लढाई आपण जिंकणार हा विश्वास आपल्यात निर्माण होत होता. कोरोनानंतर आता पावसाळा सुरू झाला आहे. या पावसातील मदतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण वाचतो. या दुर्घटनास्थळी एनडीआरएफ जवान मदतीसाठी पोहचून दिवसरात्र सेवा देतात. त्यातच, जेसीबी, पोकलँड मशिनच्या सहाय्याने येथील मलबाही हटविण्यात येत असतो. गेल्या वर्षी अशीच दुर्घटना महाड येथे घडली होती. त्यावेळी, एका जेसीबी चालक युवकाने तब्बल 48 तास सलग काम केले होते. त्यामुळे, त्याच्या कामाचे कौतुक करुन अनेकांनी त्यास मदतीही देऊ केली. आताही, अशाच एका माणूसकी दर्शवणाऱ्या जेसीबी चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे एक दुचाकीस्वार रस्त्यावर उभा राहिल्याचे दिसून येते. तर, शेजारीच असलेल्या जेसीबी चालकाने जेसीबीच्या हाताने त्याला छत दिल्याचे दिसून येते. पावसापासून रक्षण करण्यासाठी चक्क कोट्यवधी जेसीबीच छत्री बनल्याचं दिसत आहे. शरण यांनी या व्हिडिओसोबत तितकच मार्मिक कॅप्शनही दिलं आहे. जिथं शक्य आहे, तिथं ही माणूसकीची दयाळूपणाची भावना जपा, असे त्यांनी म्हटलंय. ते नेहमी शक्यही असतं, असेही ते म्हणाले.सध्या हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.