मुंबई - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रासह गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. या काळात, वैद्यकीय क्षेत्राने स्वत:ला झोकून देऊन काम केल्याचं आपण पाहिलंय. गेल्या वर्षभरापासून डॉक्टर, नर्सेस आणि संपूर्ण पॅरामेडीकल कर्मचारी कामाला लागले आहेत. या कालावधीत अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावल्याचे दिसून आले. तर, काहींना आप्तेष्ठांना गमावलं आहे. गुजरातमधील दोन डॉक्टरांनी आपल्या आईला गमावलं आहे. मात्र, आईच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासांतच कर्तव्यावर हजर होऊन या डॉक्टरांनी कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण केला आहे.
गुजरातध्ये एका डॉक्टरच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले होते, तर दुसऱ्या डॉक्टरच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. वडोदरा येथील डॉ. शिल्पा पटेल राज्य सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या एसएसजी रुग्णालयात एनॉटॉमी विभागात असोसिएटेड प्रोफेसरच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या 77 वर्षीय आई कांतालाल पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान 15 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, आपल्या भावासोबत डॉ. शिल्पा यांनी कोविड 19 च्या नियमात आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर, काही तासांतच पीपीई कीट परीधान करुन आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत.
डॉक्टर राहुल परमार यांनीही हीच संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली आहे. वडोदर येथली एसएसजी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. राहुल परमार यांच्या आईचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर, आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताच ते आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मध्य गुजरातमधील सर्वात मोठ्या रुग्णालयाती कोविड सेंटरचे ते नोडल अधिकारी आहेत.
दरम्यान, कर्तव्याला प्राधान्य देण्याची शिकवण आईनेच मला दिली आहे. त्यामुळेच, कोरोना संकट काळात आईच्या अंत्यसंस्कारानंतर आपण लगेचच कर्तव्यावर पोहोचल्याचे डॉ. शिल्पा सांगतात.