तुमकूर: एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यावरून करू नका असं म्हणतात. कपड्यावरून माणसाची पारख न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कर्नाटकमधल्या एका सेल्समननं ही चूक केली. तुमकूरमध्ये वास्तव्यास असलेला शेतकरी त्याच्या मित्रासोबत एका कारच्या शोरुममध्ये गेला होता. कार खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचे कपडे पाहून तिथल्या सेल्समननं त्याला हटकलं. त्याचा अपमान केला आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं.
चिक्कासांद्रा होबलीमध्ये राहणारे रामनपाल्या के केम्पेगौडा सुपारीची शेती करतात. केम्पेगौडा एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते. मात्र सेल्समननं त्यांची खिल्ली उडवली. केम्पेगौडा यांनी महिंद्रा बुलेरोची माहिती घेतली. दोन लाख डाऊनपेमेंट आणि त्याच दिवशी डिलेव्हरी देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. सेल्स टीमनं त्यास नकार दिला. त्यावर १० लाख रुपये एकरकमी भरतो असं केम्पेगौडा यांनी म्हटलं. यावरून सेल्स टीमनं जाणूनबुजून शेतकऱ्यांची थट्टा केली.
१० लाख दूर राहिले. तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. अर्ध्या तासात १० लाख रुपये रोख आणल्यास आजच गाडीची डिलिव्हरी करू, असं सेल्समन म्हणाला. त्यानंतर केम्पेगौडा यांनी लगेचच त्यांच्या मित्रांना रोख रकमेची व्यवस्था करण्यास सांगितलं. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी १० लाख रुपये जमवले. मात्र त्यानंतर सेल्स टीमनं कार डिलिव्हरीसाठी किमान ३ दिवस लागतील असं सांगितलं.
शुक्रवारी ही घटना घडली. त्यानंतर शनिवार, रविवारी सुट्टी असल्यानं कर्मचाऱ्यांनी असहायता व्यक्त केली. त्यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांनी शोरुमला घेराव घातला. पोलिसांनी कशीबशी त्यांची समजूत काढली. सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरुममधल्या अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केला आहे. मला कार नको. लिखित माफी हवी. अन्यथा शोरुमबाहेर आंदोलन करू, असा इशारा केम्पेगौडा यांनी दिला आहे.