बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सर्व मराठी जनतेमध्ये रोष पसरला आहे. कर्नाटकातील या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना काळं फासण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे बेळगावतही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. बेळगावात झालेल्या दगडफेकीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काय झाली घटना?
कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवभक्त रस्त्यावर उतरले आणि दगडफेक सुरु केले. बंगळुरुतील एका चौकातील पुतळा आहे. कानडी व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटले.
छत्रपती संभाजीराजेंनी केला निषेध
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मागणी केली आहे.