मुंबई : ‘हुनर हाट’सारख्या उपक्रमांमुळे आत्मनिर्भर भारत साकार करण्याच्या उद्दिष्टाला बळकटी मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी सांगितले. तेजस उपक्रमांतर्गत तीस हजार बेरोजगारांना कुशल प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी दुबईला पाठविण्यात येणार असल्याचेही ठाकूर म्हणाले.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात २७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या ‘हुनर हाट’चे आज मंत्री ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, प्रकाश जावडेकर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रदर्शनात देशभरातून एक हजार विणकर, शिल्पकार, कारागीर आपल्या उत्पादनांसह सहभागी झाले आहेत.
ठाकूर म्हणाले की, स्किल इंडिया उपक्रमांतर्गत नक्वी यांच्या मंत्रालयाने उस्ताद योजनेतून कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा लाभ घेत युवांनी नोकरी देणारी व्यक्ती बनावे. या उपक्रमातून नऊ लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे कार्य अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांनी केल्याचेही ठाकूर म्हणाले. या उपक्रमासाठी कोणत्याही कलाकाराला स्थलांतरित व्हावे लागले नाही, हे सर्वात मोठे वैशिष्ट्य असल्याचेही ठाकूर म्हणाले. दुबई आणि बहुतेक आखाती देशांमध्ये आज सर्वात जास्त संख्येने कुशल भारतीय लोक कार्यरत आहेत. तेजस उपक्रमांतर्गत वर्षभरात ३० हजार भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण देऊन दुबईमध्ये पाठविण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. तर मुंबईकरांनी ‘हुनर हाट’ला भेट देत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचा अनुभव घ्या, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.
- मुंबईतील ‘हुनर हाट’मध्ये देशाच्या प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मीळ उत्पादने घेऊन आले आहेत. देशाच्या विविध भागातील पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय करण्यात आली आहे.
- याशिवाय, रोज सर्कशीचे खेळ, महाभारताचे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पॅव्हेलियन, सेल्फी पॉईंटही असणार आहेत. प्रसिद्ध कलाकारांचा विविध गीत - संगीताचा भव्य कार्यक्रमही होणार आहे. दि. २६ एप्रिलच्या मेगा शोमध्ये लेझर शो होणार आहे.