मुंबई : हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्यापासून नागरिकांनी बँकांत दीड लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. देशातील विविध बँकांनी जारी केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियात ७५,९४५ कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच बँकेने ३,७५३ कोटींच्या नोटा बदलून दिल्या आहेत.रविवारपर्यंत १00 आणि २000 च्या नोटांच्या माध्यमातून ७,७0५ कोटी रुपये नागरिकांनी बँकांतून काढले. रविवारी बँकांनी रोखीच्या व्यवहारांना गती दिली. शाखांत अधिक रक्कम उपलब्ध करून देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना दिले. गुरु नानक जयंतीनिमित्त अनेक राज्यांत बँका बंद होत्या. गुजरात, मध्य प्रदेश, छत्त्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडून, बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये सोमवारी बँका सुरू होत्या. कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ राकेश शर्मा यांनी सांगितले की, सार्वजनिक सेवांची बिले अदा करण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत वाढविण्यात अल्यामुळे पुढील ्रभरणा वाढण्याची शक्यता आहे.
स्टेट बँकेच्या कॅशियरचा मृत्यू-भोपाळ : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पुरुषोत्तम व्यास असे त्यांचे नाव असून ते ४५ वर्षांचे होते. भोपाळच्या रतीबाद शाखेमध्ये काम करत असताना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरुषोत्तम यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला. बँकांतील कर्मचाऱ्यांचा ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून ताण प्रचंड वाढला आहे. रविवारीही देशभरातील बँका सुरु होत्या. नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी देशातील सर्वच बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्या असल्याने बँकेचे कर्मचारी जास्तीत जास्त वेळ थांबून काम करत आहेत. गेल्या बुधवारी स्टेट बँकेचे आठ कर्मचारी रात्री उशिरा काम आटोपून घरी जात असताना अपघातात मरण पावले होते.