रांची - झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील खरसावा तालुक्यातील एका पोस्ट कार्यालयात शेकडो खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. सन 2016 ते 2020 या कालावधीत तत्कालीन पोस्ट मास्टर अतिश कुल्लू यांनी ही हेराफेरी केल्याचं सांगण्यात येत आहे. नवीन पोस्टमास्टर शंकर लाकडा यांनी 5 जून 2020 रोजी पदभार घेतला. त्यानंतर, रेकॉर्ड चेकिंगमध्ये हा घोटाळा उघडकीस आला आहे.
आमदा येथील उपविभागीय पोस्ट कार्यालयात सन 2016 ते 2020 या कालावधीत अतिश कुल्लू यांच्याद्वारे शेकडो खातेदारांची रक्कम हडप करुन हेराफेरी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नवीन पोस्ट मास्टर लाकडा यांनी पदभार स्विकारल्यानतंर संबंधित रेकॉर्ड तपासल्यानंतर ही घटना समोर आली आहे. खातेदारांनी पोस्ट कार्यालयात पैसे जमा करुन पावती घेतली. मात्र, जमा केलेल्या पैशांच्या तुलनेत कमी प्रमाणात रक्कम या खातेदारांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळेच, हेराफेरीचा संशय बळावला आहे. या उप विभागीय पोस्ट कार्यालयात आरडी, सेव्हिंग, सुकन्या समृद्धी योजनासंह तब्बल 4 हजार खातेधारक आहेत. त्यापैकी, अधिकाधिक प्रकरणात जमा केलेल्या रकमेंपैकी अतिशय कमी प्रमाणात रक्कम त्यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं दिसून येत आहे.
पोस्ट कार्यालयातील या घोटाळ्याची बातमी समजताच खातेदारांनी पोस्ट कार्यालयात धाव घेतली आहे. तसेच, आपल्याकडे असलेल्या पावत्या देऊन जमा रक्कम परत करण्याचा आग्रह केला आहे. आमदा येथील रहिवासी असलेल्या शरतचंद्र यांनी खात्यात 1 लाख रुपये जमा केले आहेत. त्यांच्याकडे या जमा केलेल्या रकमेच्या पावत्याही आहेत. मात्र, कार्यालयातील संगणकात त्यांच्या खात्यात केवळ 40 हजार रुपयेच दिसून येत आहे. त्यामुळे, शरतचंद्र यांनीही चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पूर्वीच्या पोस्ट मास्टरने खातेदारांचे सर्व पैसे त्यांना परत मिळतील, असे आश्वासन दिल्याचे सध्याचे पोस्ट मास्टर लाकडा यांनी म्हटलंय. मात्र, खातेदारांचा विश्वास या कार्यालयावर नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.