नवी दिल्ली - मणिपूरहून इस्रायलला जाण्यासाठी दोनशेहून अधिक लोक दिल्लीत पोहोचले होते. मात्र, कोरोनामुळे यांपैकी अनेकांना जाता आले नाही. राजधानी दिल्लीतील करोलबागच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले हे लोक एअरपोर्टवर पोहोचले, तेव्हा त्यांतील 40 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांना गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथील श्री गुरू तेगबहादूर कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. यांत गंभीर लक्षणे नाहीत. पण, एवढ्या मोठ्या संख्येने इस्रायलला स्थलांतरित होणारे हे लोक नेमके कोण?
इस्रायलसोबत काय कनेक्शन? -इस्रायलला जाण्यासाठी निघालेले हे सर्व लोक बिनेई मेनाशे (bnei menashe jews) समुदायाचे आहेत. देशातील इशान्येकडील राज्य मणिपूर आणि मिझोरममध्ये बिनेई मेनाशे समुदायाचे दहा हजारहून अधिक यहूदी लोक राहतात. यांचा संबंध इस्रायलमधील 12 गोत्रांपैकी एक असलेल्या मेनाशे समुदायाशी असल्याचे लोक मानतात. येथून गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर यहूदी लोक इस्रायलला गेले आहेत.
इस्रायलमध्ये जाऊन स्थाईक होण्याची या यहुदी लोकांची इच्छा आहे आणि इस्रायल सरकारकडूनही त्यांना नागरिकता दिली जात आहे. मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हे लोक इस्रायलमध्ये स्थाईकही झाले आहेत. तसेच आणखीही काही लोक तेथे जात आहेत. यातील अनेक लोक सांगतात, की त्यांचे पूर्वज तेथीलच आहेत आणि आपल्या भूमीत जाण्याची आपली इच्छा आहे.
अनेक वर्षांपासून आहे कल्पना -खरे तर या यहुदी समुदायाच्या लोकांचे संबंध 1950 च्या दशकांतच स्पष्ट झाले होते. अनेक लोकांनी 1970 च्या दशकांतच मणिपूरमध्ये यहुदी धर्म मानायला सुरुवात केली होती. मेनाशे हे इस्रायलली समुदायाचेच एक गोत्र आहे. यांना समाजाला 2,700 पेक्षाही अधिक वर्षांपासून निर्वासित करण्यात आले होते. मेनाशे समाजाच्या अनेक लोकांचे म्हणणे आहे, की काही शतकांपूर्वी इशान्य भारत आणि या भागाला लागून असलेल्या देशांत त्यांचे पूर्वज येऊन स्थाईक झाले होते. यांपैकी अनेक जण चीनमार्गे येथे आले होते. मणिपूरच्या पाहाडी भागात राहणारे कुकी, समाजाचा एक वर्ग असे मानतो, की ते बिनेई मेनाशेशी संबंधित आहेत.
...म्हणून या लोकांना बोलवत आहे इस्रायल -इशान्येकडील भारतातून बिनेई मेनाशे समुदायातील 160 यहूदी लोक सोमवारी इस्रायलला पोहोचले. तर 40 सदस्य कोरोना बाधित आढळल्याने 115 जण भारतातच राहीले. भारतात एकूण 275 यहुदी समाजाच्या लोकांना सोमवारी इस्रायल येथे जायचे होते. एक सरकारी संघटना शावी इस्रायल, अदृष्य होत चाललेल्या या समुदायाच्या यहुदी लोकांना (जे इस्रायलमध्ये येण्यास उत्सुक आहेत.) परत आणण्याची मोहीम चालवत आहे.