आगरतळा - पश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे तब्बल 382 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच आगरतळा महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी पाणी साचले आहे.
राज्याचे मुख्य सचिव एल. के. गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे पाण्याच्या योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने विजेच्या खांबावर झाडं उन्मळून पडल्याने खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच सरकारचे या स्थितीवर लक्ष असून त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. बुधवारी सरासरी 19.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Cyclone Fani : ओडिशामध्ये फनीचा तडाखा; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता. 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 3 मे रोजी ओडिशा येथे 240 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चक्रीवादळात जवळपास 241 जण जखमी झाले आहेत. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 वर होता तो वाढून आता 64 झाला आहे. पुरी जिल्ह्याशिवाय खुर्दा जिल्ह्यात 9 जण, कटक जिल्ह्यात 6, मयूरभंजमध्ये 4, केंद्रपाडा आणि जाजपुर येथे प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला.
ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले होते. वीज पूरवठा खंडीत झाला होता. फनी या चक्रीवादळाचा फटका 1 कोटी 50 लाख नागरिकांना बसला आहे. सरकारकडून 12 मे पर्यंत वीजपूरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पुरी, अंगुल, मयूरगंज, केंद्रपाडा या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ओडिशामध्ये 1999 मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये राज्यातील 10 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याआधी 2018 मध्ये आलेल्या तितली वादळात 60 लोकांचा मृत्यू झाला होता तर 2013मधील फालिन वादळात 44 लोकांचा मृत्यू झाला होता.